प्रस्तावित वेतन करारामध्ये अपेक्षित वाढ न मिळाल्याच्या निषेधार्थ येत्या २३ एप्रिलपासून पुकारण्यात येणाऱ्या बेमुदत संपामुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांना एसटीऐवजी खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागणार आहे. पण ज्यांनी अगोदर आरक्षण केले आहे त्यांनाही संपामुळे शेवटच्या क्षणी धावाधाव करावी लागणार असल्याने प्रवाशांचे होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या २०१२-१६ या वर्षांंसाठी प्रस्तावित असलेल्या वेतन करारामध्ये राज्य शासनाने केवळ १० टक्के वाढ दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या रत्नागिरी येथे झालेल्या दोन दिवसीय अधिवेशनामध्ये कर्मचाऱ्यांनी २३ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारने वेतन कराराच्या प्रश्नामध्ये वेळीच लक्ष घालून २५ टक्के वेतवाढीचा करार केला तर संप मागे घेण्यात येईल, असेही रत्नागिरीच्या अधिवेशनामध्ये ठरल्याचे संघटनेच्या पत्रकात म्हटले आहे. कर्मचाऱ्यांच्या या निर्णयामुळे उन्हाळी सुट्टीमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांचे धाबे दणाणले असून अनेकांनी आपले केलेले आरक्षण रद्द करून खासगी सेवेने गावी जाण्याचा विचार सुरू केला आहे.
काहींनी एसटीच्या संभाव्य संपामुळे १५ एप्रिलनंतर खासगी गाडय़ांचे आरक्षण करण्याकडे भर दिला आहे. एसटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळी सुट्टीसाठी अनेक गाडय़ांचे आरक्षण पूर्ण झाले असून महामंडळ जादा गाडय़ा सोडण्याच्या विचारात आहे.
दरम्यान, प्रस्तावित वेतन करारामध्ये संघटनेच्या अपेक्षांची पूर्तता न झाल्यास वेतन करारावर स्वाक्षरी न करण्याचा निर्णय एसटी कामगारांच्या अधिकृत संघटनेने घेतला असून केवळ वेतनाचा प्रश्न नव्हे तर कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांबाबत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी आणि मॅक्सीकॅबसारख्या छोटय़ा खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीचे परवाने देऊ नयेत अशी मागणीही संघटनेने केली आहे. उन्हाळी सुट्टीमध्ये प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य शासनाने त्वरित कामगारांना समाधान देणारा वेतन करार करावा, असेही आवाहन संघटनेने केले आहे.