टॅक्सी चालकांकडूनही लुटमार
हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी टर्मिनस ते वडाळा स्थानकात घेण्यात आलेल्या ब्लॉकचा फटका सलग दुसऱ्या दिवशी प्रवाशांना बसला. या मार्गावरील प्रवाशांना ट्रान्स हार्बर आणि मुख्य मार्गे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र मुख्य मार्गावर हार्बरच्या प्रवाशांची भर पडल्यामुळे रेल्वे गाडीच्या डब्यात प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे प्रवाशांना हाल सहन करत प्रवास करावा लागला. यात बारावीची परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांनाही कसरत करत परीक्षा केंद्र गाठावे लागल्याचे पाहायला मिळाले. प्रवाशांना ब्लॉकमुळे दोन दिवस झालेल्या अडचणींचा प्रत्यय रविवारीही येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हार्बर मार्गावर कामे करण्यात येत आहेत. या कामासाठी जवळपास ४०० रेल्वे अधिकारी-कामगार काम करत आहेत. शुक्रवारी छत्रपती शिवाजी टर्मिनसहून हार्बर मार्गावर सुटणाऱ्या लोकलच्या १४५ फेऱ्या रद्द केल्या होत्या. तर शनिवारी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते वडाळ्यापर्यंत लोकल सेवा बंद ठेवल्याने प्रवाशांना पर्यायी मार्ग घ्यावे लागत होते. त्यामुळे शनिवारी प्रवाशांना त्रासाला तोंड द्यावे लागले. रविवारीही प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनस वडाळा रोडपर्यंत वाहतूक बंद असल्यामुळे टॅक्सी व खासगी वाहन चालक ‘कार्यरत’ झाले होते. रेल्वे मार्ग बंद असल्याने अनेक टॅक्सी चालकांनी मीटरपेक्षा अधिक भाडे आकारल्याच्या तक्रारी प्रवासी करत होते. यावर अतिरिक्त भाडे आकारणाऱ्या चालकांवर दोन पथकांद्वारे कारवाई करण्यात येत असल्याचे वडाळा प्रादेशिक विभागाचे अधिकारी जयंत ससाणे यांनी सांगितले.
हार्बर मार्गावरील ब्लॉकमुळे प्रवाशांना फटका
हार्बर मार्गावर कामे करण्यात येत आहेत. या कामासाठी जवळपास ४०० रेल्वे अधिकारी-कामगार काम करत आहेत.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 21-02-2016 at 02:26 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passengers affected by harbour line blocks