सरासरी ९९.८ टक्के कामगिरी
अक्षय मांडवकर, मुंबई : रेल्वे-बेस्टच्या बेभरवशाच्या कारभाराला कंटाळलेल्या प्रवाशांना घाटकोपर-वर्सोवा या मार्गावर धावणाऱ्या मुंबईतील पहिल्या ‘मेट्रो वन’चा मात्र चांगला अनुभव येत आहे. मेट्रो-१ने वक्तशीरपणात ९९.८ टक्के सातत्य टिकवले आहे. दररोज रात्री चार तास मेहनत करून मेट्रोचे कर्मचारी गाडी वेळेवर चालावी यासाठी प्रयत्नशील असतात. वक्तशीरपणामुळे या मार्गावर गर्दीच्या वेळी ४४ फेऱ्या वाढवणे मेट्रो-१ला शक्य झाले आहे.
घाटकोपर-वर्सोवा या ‘मेट्रो-१’ सेवेला सुरुवातीपासूनच प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. २०१७-१८ या कालावधीत या मार्गिकेवरील प्रवासी संख्येमध्ये १३ टक्क्यांनी वाढ झाली. सध्या या मार्गावर दररोज सुमारे साडेतीन लाख प्रवासी प्रवास करतात. मेट्रो-१ने आपल्या गाडय़ांचे वेळापत्रक जवळपास १०० टक्के पाळण्यात यश मिळविले आहे. वक्तशीरपणामुळे प्रवासी संख्येत वर्षांगणिक वाढ होत आहे. मेट्रोची गेल्या तिन्ही वर्षांची वक्तशीरपणाची सरासरी एकूण ९९.८९ टक्के आहे. यामुळे मेट्रो फेऱ्यांमध्ये देखील वाढ करण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे.
आता सकाळी ११.३० ते सायकांळी ४.३० या गर्दीच्या वेळेत दररोज ४०० मेट्रो फेऱ्या होत असून दर पाच मिनिटांनी प्रवाशांना मेट्रो उपलब्ध होत आहे. यापूर्वी फे ऱ्यांची संख्या ३९६ होती. तर दर आठव्या मिनिटाला प्रवाशांना मेट्रो उपलब्ध होत होती. रात्री चार तास सेवा बंद झाल्यावर १२ गटांच्या साहाय्याने होणाऱ्या व्यवस्थापनाची प्रक्रिया हा वक्तशीरपणा टिकविण्यासाठी कारणीभूत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
अहोरात्र मेहनत
’ रात्री १२च्या सुमारास शेवटची मेट्रो कारशेडमध्ये गेल्यानंतर तांत्रिक गटांसह प्रत्यक्ष स्थळी काम करणारे एकूण १२ गट कार्यरत होतात. चार तास मेहनत करून ही सेवा पुन्हा कार्यान्वित करण्याची संपूर्ण जबाबदारी या गटांकडे असते. स्वच्छता, गाडय़ांची तांत्रिक तपासणी, रुळांची तपासणी, सिग्नल तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाते.
’ मेट्रो गाडय़ा कारशेडमध्ये दाखल झाल्यावर स्वच्छता गटातील कर्मचारी गाडय़ांच्या सफाईला सुरुवात करतात. याशिवाय रुळांची तपासणी करणारे कर्मचारी चार तासांत संपूर्ण मार्गिका फिरून तपासणीचे काम पूर्ण करतात. दरम्यानच्या काळात मेट्रोला विद्युतपुरवठा करणाऱ्या तारांच्या तपासणीचे काम केले जाते. शिवाय सिग्नल यंत्रणेतील बिघाडदेखील दूर केले जातात.
सकाळी सेवा सुरू होण्यापूर्वी प्रत्येक गाडीची तांत्रिक तपासणी करण्याचे काम ऑपरेटिंग टीम पूर्ण करते. त्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र दिले जाते. याशिवाय मेट्रो सुरू करण्यापूर्वी दररोज मेट्रो चालकासह इतर कर्मचाऱ्यांची वैद्यकीय चाचणी पूर्ण केली जाते.