मुंबई/ठाणे/पनवेल : पनवेल- दिवा रेल्वेमार्गावर शनिवारी दुपारी मालगाडी घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक रविवार संध्याकाळपर्यंत पूर्णत: कोलमडली होती. परिणामी, २७ गाडय़ा रद्द करण्यात आल्या, तर १५ गाडय़ा वेगवेगळय़ा ठिकाणी थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. थांबवून ठेवण्यात आलेल्या गाडय़ांमधील हजारो प्रवाशांचे १६ ते २९ तास अन्नपाण्यावाचून अतोनात हाल झाले.
घसरलेली मालगाडी रुळांवर आणण्यासाठी आणि ओव्हरहेड वायर दुरुस्तीसाठी ब्लॉक घेतल्याने अप-डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प होती. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या अनेक गाडय़ा ठिकठिकाणी थांबवण्यात आल्या होत्या. तर अनेक गाडय़ा रद्द करण्यात आल्याने सीएसएमटी, दादर, ठाणे, लोकमान्य टिळक टर्मिनल, पनवेल येथे प्रवासी अनेक तास गाडय़ांच्या प्रतीक्षेत ताटकळत होते. रविवारी सायंकाळी ६.३५ वाजता दिवा – पनवेल मार्ग सुरू झाला, तर सायंकाळी ७.३५ वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले, असे मध्य रेल्वेतर्फे सांगण्यात आले.
हेही वाचा >>> निळजे स्थानकात प्रवाशांकडून तोडफोड
दिवा-पनवेल रेल्वे मार्गावरील कळंबोलीजवळ शनिवारी दुपारी ३च्या सुमारास मालगाडीचे डबे घसरल्यामुळे संपूर्ण कोकण रेल्वे मार्ग ठप्प झाला. कोकणातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाडय़ा ठिकठिकाणी थांबवून ठेवण्यात आल्या. परिणामी, प्रवासी सुमारे १६ ते २९ तास गाडय़ांमध्ये अडकून पडले. नेमके काय घडले आहे याची साधी माहितीही प्रवाशांना दिली जात नव्हती. त्यामुळे ते संताप व्यक्त करीत होते.
कोकणातून शनिवारी सकाळी निघालेल्या काही रेल्वेगाडय़ा रविवारी सकाळी १० नंतर पनवेल स्थानकात पोहोचल्या. यावरून गाडय़ांमध्ये अडकलेल्या प्रवाशांचे किती हाल झाले असावेत, याची कल्पना यावी. परंतु त्याची खंत कोकण रेल्वेला नव्हती. रेल्वेच्या भोंगळ कारभाराबद्दल संताप व्यक्त करण्याशिवाय प्रवाशांच्या हाती काहीही नव्हते. मुंबईकडे येणाऱ्या खोळंबलेल्या रेल्वेगाडय़ांमधील प्रवाशांना अन्नपदार्थ आणि पाणी मिळणेही जिकरीचे झाले होते.
हेही वाचा >>> रेल्वे प्रशासनाला आधुनिकतेची गरज
कोकण रेल्वे मार्गावर ठिकठिकाणी रेल्वेगाडय़ा थांबवून ठेवल्याने हा मार्ग ठप्प होता. अप मार्गावर रोहा-दिवा डेमू नागोठाणे येथे तर रत्नागिरी-दिवा गाडी कासू येथे थांबवण्यात आली होती. मडगाव-सीएसएमटी एक्सप्रेस आपटा येथे थांबवण्यात आली होती. सावंतवाडी-दिवा एक्सप्रेस, मडगाव-सीएसएमटी एक्सप्रेस पनवेल येथे तर कुडाळ-एलटीटी विशेष गाडी नागोठाणे येथे थांबवून ठेवण्यात आली होती. डाऊन मार्गावरील सीएसएमटी- मंगळुरू एक्सप्रेस दिवा येथे, दादर-सावंतवाडी एक्सप्रेस निळजे येथे, ओखा-एर्नाकुलम तळोजा येथे, चंडीगड-मडगाव एक्सप्रेस, नागपूर-मडगाव एक्सप्रेस दातीवली येथे थांबवण्यात आली होती.
गाडय़ांची स्थिती..
– कोकण रेल्वेच्या ५५ गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडले.
– १० गाडय़ा अंशत: तर २७ गाडय़ा पूर्णत: रद्द, १२ गाडय़ांच्या मार्गात बदल.
– कोकण रेल्वे मार्गावरील ५४ एक्स्प्रेस रेल्वेगाडय़ांना फटका.
– १५ रेल्वेगाडय़ा वेगवेगळय़ा ठिकाणी १२ तासांहून अधिक वेळ थांबवल्याने प्रवाशांचे हाल.
– २ ऑक्टोबरच्या एलटीटी-मंगळूरू आणि मंगळूरू ते एलटीटी या गाडय़ा रद्द.
मांडवीचा १६ तास प्रवास
शनिवारी सकाळी ११ वाजता ओरोस येथून सुटलेली मांडवी एक्स्प्रेस सायंकाळी ७ वाजता पनवेलला पोहोचते. मात्र ती रविवारी सकाळी १० वाजता पोहोचली. शनिवारी रात्री १२ वाजता तिला जिते स्थानकाजवळ थांबवण्यात आले. त्यानंतर तिच्यामागे अन्य गाडय़ाही थांबवण्यात आल्या. रविवारी पहाटे ६च्या सुमारास सोमाटणे आणि आपटा स्थानकाजवळ ही गाडी पुन्हा थांबली. अखेर अनेक प्रवासी गाडीतून उतरून महामार्गावर आले आणि तेथून त्यांनी मिळेल त्या खासगी वाहनाने मुंबई गाठली.
तुतारीच्या प्रवासाचे तीनतेरा
शनिवारी रात्री १२ वाजता दादर स्थानकातून सुटलेली तुतारी एक्सप्रेस रविवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत नावडेरोड येथे उभी करण्यात आली. प्रवासी १४ तास गाडीतच अडकून पडले होते. काहींनी नावडे रोड येथे उतरुन पुढील प्रवास रस्ते महामार्गाने केला. या गाडीतील प्रवाशांना काय घडले आहे, गाडी का थांबवण्यात आली आहे, याविषयी कोणतीही माहिती देण्यात येत नव्हती.
दुरुस्तीकाम विलंबाने
हार्बर रेल्वे मार्गावर शनिवारी ३६ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे मुंबईहून येणारे रेल्वे कामगार कळंबोली येथे उशिराने पोहोचले. त्याचा परिणाम मदतकार्यावर झाला, असे सांगण्यात आले.
पनवेल येथे मालगाडी घसरही होती. ब्लॉक घेऊन मालगाडीचे डबे रुळांवर आणण्यात आले. पनवेल-दिवा अप आणि डाऊन रेल्वेसेवा सुरू झाली आहे.
– डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
मेगाब्लॉक नसतानाही मुंबईकरांना फटका
कोकण रेल्वे मार्ग ठप्प झाल्याने दिवा स्थानकावर शनिवार रात्रीपासून रविवार सकाळपर्यंत अडकून पडलेल्या मंगळुरू एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी संतप्त होत उपनगरी रेल्वे मार्गावर ठाण मांडले. त्यामुळे मेगाब्लॉक नसतानाही रविवारी सकाळी मुंबईकर प्रवाशांचाही सुमारे तासभर खोळंबा झाला. यावेळी उडालेल्या गोंधळात एक प्रवासी जखमी झाला. तर रविवारी दुपारी मंगळुरू एक्स्प्रेस निळजे स्थानकात थांबवल्यानंतर काही प्रवाशांनी गाडीतून उतरून तोडफोड केली. याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाने गुन्हा दाखल केला आहे.
काय घडले?
’दिवा-पनवेल मार्गावर शनिवारी दुपारी ३ वाजता मालगाडीचे पाच डबे घसरले.
’छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -मंगळुरू एक्स्प्रेस दिवा रेल्वे स्थानकात थांबवण्यात आली.
’ती रविवार सकाळपर्यंत तेथेच होती. नेमके काय घडले, गाडी कधी पुढे जणार याची नेमकी माहिती दिली जात नव्हती.
’ही गाडी पुणे मार्गे वळवण्याची अफवा पसरल्याने प्रवासी संतापले आणि त्यांनी उपनगरी रेल्वे मार्ग रोखला.
अन्नपाण्याविना प्रवासी
कोकण रेल्वे मार्गावर १५ गाडय़ा थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे हजारो प्रवासी अन्नपाण्याविना अडकून पडले होते. पाण्याच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थाची सोय करण्यात आली, तसेच नागोठणे, कळंबोली, तळोजा येथे बसची व्यवस्था केल्याचा दावा मध्य रेल्वेने केला. तर दिवा-पनवेल दरम्यान अडकलेल्या प्रवाशांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार त्यांच्या पक्षकार्यकर्त्यांनी अन्नपदार्थ आणि पाणी पुरवल्याची माहिती देण्यात आली.