मुंबई : मध्य आणि कोकण रेल्वेवरून धावणारी वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस यावर्षीच्या पावसाळ्यात धावेल की नाही, अशी शंका प्रवाशांच्या मनात निर्माण झाली आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) संकेतस्थळावर १५ जूननंतरचे सीएसएमटी – मडगाव वंदे भारत आणि तेजस एक्स्प्रेस, एलटीटी – मडगाव एक्स्प्रेसचे तिकीट प्रवाशांना मिळेनासे झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यात वंदे भारतमधून प्रवास करण्यास प्रवासी मुकणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोकण रेल्वेवरील कोलाड – ठोकूर या ७४० किमी पट्ट्यात पूर्व पावसाळी कामे हाती घेण्यात येतात. तसेच मुसळधार पावसात दृश्यमानता कमी होते. त्याचबरोबर दरड कोसळणे, आपत्कालीन घटना घडतात. त्यामुळे कोकण रेल्वेवर जून – ऑक्टोबर या काळात पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येते. त्यामुळे कोकण रेल्वेवरील पावसाळी वेळापत्रकानुसार होणारे बदल आरक्षण प्रणालीतही होतात. परंतु, अद्याप पावसाळी वेळापत्रक जाहीर झालेले नाही. असे असले तरी प्रवाशांना जून महिन्यातील तिकीट काढण्यास अडचण येत आहेत.

अनेक प्रवाशांनी आयआरसीटीसी संकेतस्थळावरून वंदे भारत, तेजस, एलटीटी-मडगाव एक्स्प्रेसचे तिकीट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते मिळू शकले नाही. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी रेल्वेगाड्यांचे तिकीट काढावे लागत आहे. तसेच पावसाळ्यात कोकणातील वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस, एलटीटी – मडगाव एक्स्प्रेस धावणार की नाही याबाबत प्रवासी संभ्रमात आहेत. पुढील आठवड्यात पावसाळी वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. त्यानंतर, सर्व रेल्वेगाड्यांच्या वेळा ठरतील, असे कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

गाडी क्रमांक २२२२९ / २२२३० सीएसएमटी – मडगाव – सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, गाडी क्रमांक २२११९ / २२१२० सीएसएमटी – मडगाव – सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस यांसारख्या प्रीमियम रेल्वेगाड्यांसह गाडी क्रमांक ११०९९ / १११०० लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांचे १५ जूननंतरचे आरक्षण करताना प्रवाशांना अडचणी येत आहे.

कोकण रेल्वेवरील पावसाळी वेळापत्रकाचा सर्वात जास्त फटका अतिजलद (सुपरफास्ट) रेल्वेगाड्यांना बसतो. कोकण रेल्वेवरून धावणारी रेल्वेगाडी अतिजलद होण्यासाठी तिच्या दोन्ही दिशांचा सरासरी वेग किमान ५५ किमी प्रतितास इतका असणे आवश्यक असते. त्यानंतर या रेल्वे गाड्यांना अतिजलद अधिभार लावून तो प्रवाशांकडून वसूल केला जातो. परंतु, पावसाळ्यात हा वेग मंदावतो. तरीही अधिभार आकारला जातो. त्यामुळे प्रवाशांकडून जादा पैसे वसूल करण्यात येतात.

कोकण रेल्वेने पावसाळी वेळापत्रक अद्ययावत केल्यानंतर रेल्वेच्या वेळा जाहीर होतील. त्यानंतर प्रवाशांना तिकीट आरक्षण करता येईल. – डाॅ. स्वप्निल निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

जून महिन्यातील कोकणातील रेल्वेगाड्यांचे आरक्षण सुरू झाले आहे. परंतु, कोकणातील वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस आणि एलटीटी – मडगाव एक्स्प्रेसचे १५ जूननंतरचे आरक्षण उपलब्ध नाही. कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक यंदा १५ जूनपासून लागू होणार आहे. परंतु, याबाबतचे वेळापत्रक अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रवाशांना जून महिन्यातील रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण करता येत नाही. – अक्षय महापदी, सदस्य, कोकण विकास समिती