मुंबई महानगरपालिकेने सोमवारपासून अंधेरीमधील गोखले उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद केला असून या परिसरात वाहतूक कोंडींचा प्रश्न जटील बनला आहे. परिणामी, अनेक प्रवासी ‘घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो १’ मार्गिकेचा पर्याय निवडू लागले आहेत. या मार्गिकेवरील आझाद नगर – अंधेरी मेट्रो स्थानकांदरम्यान प्रवासी संख्येत सोमवारी ११ हजारांनी, तर मंगळवारी १७ हजारांनी वाढ झाली. या दोन्ही मेट्रो स्थानकांवरून प्रवास सुरू करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे.
हेही वाचा >>> मुंबई : मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वे विलंबाने
अंधेरी पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा महत्त्वाचा असा गोखले उड्डाणपूल धोकादायक बनल्याने सोमवारी तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पुढील दोन वर्षे हा पूल बंद राहणार आहे. या पुलावरून दैनंदिन प्रवास करणारे अनेक प्रवासी ‘मेट्रो १’कडे वळू लागले आहेत. उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यानंतर पहिल्याच दिवशी ‘मेट्रो १’च्या प्रवासी संख्येत ११ हजारांनी वाढ झाली. तर मंगळवारी सार्वजनिक सुट्टी असतानाही आझाद नगर – अंधेरी मेट्रो स्थानकांदरम्यान प्रवाशांच्या संख्येत १७ हजाराने वाढ झाल्याची माहिती ‘एमएमओपीएल’च्या प्रवक्त्याने दिली. या स्थानकांदरम्यान दिवसाला सरासरी तीन लाख ३० हजार प्रवासी प्रवास करीत होते. दोन दिवसांत ही संख्या तीन लाख ४५ हजारांवर पोहोचली आहे. ‘मेट्रो १’च्या प्रवासी संख्येत वाढ झाल्याने आझाद नगर आणि अंधेरी मेट्रो स्थानकांवर तिकीटासाठी मोठ्या रांगा लागत आहेत. दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये प्रवासी संख्येत आणखी वाढ होईल, असा दावा ‘एमएमओपीएल’कडून करण्यात आला आहे. सध्या आझाद नगर आणि अंधेरी स्थानकांदरम्यानच्या प्रवासी संख्येत वाढ होत आहे. ‘मेट्रो १’ मार्गिकेवर सध्या मेट्रोच्या पुरेशा फेऱ्या होत आहेत. त्यामुळे तूर्तास तरी फेऱ्या अथवा गाड्यांच्या संख्येत वाढ करण्यात येणार नसल्याचे ‘एमएमओपीएल’च्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट करण्यात आले.