मुंबई : रेल्वे प्रशासनाने रेल्वेगाड्यांमधील शयनयान डबे (स्लीपर कोच) कमी करून त्याऐवजी इकॉनॉमी क्लासचे वातानुकूलित डबे जोडण्यावर भर दिला आहे. तसेच काही रेल्वेगाड्यांना वातानुकूलित श्रेणीचे डबे जोडण्यात येत आहेत. शयनयान डब्यापेक्षा वातानुकूलित डब्याचे तिकीट दर अधिक असल्याने, सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री बसत आहे. मागणी नसतानाही वातानुकूलित डबे वाढविण्याच्या निर्णयाला प्रवाशांकडून विरोध होऊ लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य रेल्वे प्रशासनाने नुकताच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हावडा अतिजलद साप्ताहिक एक्स्प्रेसच्या संरचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यात या रेल्वेगाडीचे दोन शयनयान डबे रद्द करून वातानुकूलित डबे वाढविण्यात आले आहेत. सुट्टी आणि सणासुदीच्या काळात सीएसएमटी – हावडा एक्स्प्रेसची प्रतीक्षायादी क्षमतेपेक्षा अधिक असते. यामध्ये शयनयान डब्यामधील प्रतीक्षायादी फुल्ल असते. मात्र या रेल्वेगाडीला एकूण सात शयनयान डबे जोडण्यात आले होते. त्यापैकी दोन डबे हटवल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा…“बऱ्याच वर्षांपासून गृहखातं असल्याने, त्यांचा अन्…”; फडणवीसांच नाव न घेता भास्कर जाधवांची खोचक टीका!

गाडी क्रमांक १२८६९ सीएसएमटी – हावडा अतिजलद साप्ताहिक एक्स्प्रेसला १८ ऑक्टोबरपासून आणि गाडी क्रमांक १२८७० हावडा – सीएसएमटी अतिजलद साप्ताहिक एक्स्प्रेसला २० ऑक्टोबरपासून नवीन डबे जोडण्यात येणार आहेत. सुधारित संरचनेनुसार या रेल्वेगाडीला एक प्रथम वातानुकूलित, दोन वातानुकूलित – द्वितीय डबे, सहा वातानुकूलित – तृतीय डबे, तीन वातानुकूलित – तृतीय इकॉनॉमी डबे, पाच शयनयान डबे, तीन सर्वसाधारण द्वितीय श्रेणी यासह एक गार्ड्स ब्रेक व्हॅन, एक वातानुकूलित पॅन्ट्री कार आणि एक जनरेटर व्हॅन असे २२ एलएचबी डबे असतील. दोन शयनयान डबे रद्द करून, एक तृतीय वातानुकूलित श्रेणी डबा आणि प्रथम वातानुकूलित डबा जडण्यात आला आहे. प्रवाशांना ऑक्टोबर महिन्यानंतरची तिकीटे सुधारित संरचनेनुसार काढावी लागतील.

हेही वाचा…मुंबई : जे. जे. रुग्णालयातील रुग्ण कक्ष होणार अद्ययावत, पुढील वर्षापर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य

गोरगरीब प्रवाशांसाठी रेल्वेगाडीचे शयनयान डबे खूप फायदेशीर आहेत. मात्र रेल्वे मंडळ हे डबे रद्द करून वातानुकूलित डबे जोडत आहे. त्यामुळे प्रवाशांना जादा तिकीट भाडे असलेले तिकीट काढावे लागत आहेत. देशात वंदे भारत सारखी अत्याधुनिक रेल्वेगाडी धावत आहे. मात्र आर्थिकदृष्ट्या सक्षम प्रवासी यातून प्रवास करतात. सर्वसामान्य प्रवाशांसाठी शयनयान डबे वाढवणे आवश्यक आहे. – नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passengers oppose railways shift from sleeper to air conditioned coaches citing high costs mumbai print news psg
Show comments