मुंबई : पश्चिम रेल्वेवरील माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी शुक्रवारी रात्रीपासून ९.३० तासांचा ब्लाॅक घेण्यात आला होता. या ब्लाॅकचे पडसाद शनिवारी संपूर्ण दिसून आले. लोकल १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत होत्या. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. तर, लोकलच्या बिघडलेल्या कारभारामुळे अनेकांनी कार्यालयात न जाणे पसंत केले. तर, काहींनी लोकलमधील गर्दीत धक्काबुक्की सहन करून प्रवास केला.
पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावर शुक्रवारी रात्री ११ ते शनिवारी सकाळी ८.३० पर्यंत आणि डाऊन जलद मार्गावर रात्री १२.३० ते सकाळी ६.३० पर्यंत ब्लॉक घेण्यात आला होता. ब्लाॅक काळात शेकडो लोकल सेवा रद्द, तर काही अंशत: रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ब्लाॅक काळात प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. शनिवारी सकाळपासून प्रवाशांना विलंबायातना सोसतच लोकलमधून प्रवास करावा लागला. ब्लाॅक सकाळी ८.३० वाजेपर्यंत होता. मात्र, सकाळी ९.३० वाजेपर्यंत लोकलचे वेळापत्रक बिघडलेले होते.
त्यानंतर लोकलच्या वेळा दाखवून, लोकल चालवण्यात येत होत्या. परंतु, या लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. अंधेरी, बोरिवली या महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. सहा महत्त्वाच्या स्थानकांवर धीम्या लोकल थांबत नसल्याने प्रवासी संतप्त झाले होते. चर्चगेट – दादर दरम्यान जलद मार्गावर रेल्वे वाहतूक सुरू होती. तर विरार – अंधेरीदरम्यान काही लोकल सुरू होत्या. मात्र अंधेरीहून पुढे लोकल उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे हाल झाले. अप आणि डाऊन मार्गावरील काही धीम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या. त्यामुळे धीम्या मार्गावरील स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी सेवेचा आधार घ्यावा लागला. मात्र, बेस्ट बसच्या अपुऱ्या सेवेमुळे रस्ते मार्गाने प्रवास करताना प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.