मुंबई : वेळेत न मिळणारे वेतन, खात्यावर जमा होत नसलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम आदी विविध कारणांमुळे वडाळा आगारातील कंत्राटी चालक व अन्य कर्मचाऱ्यांचे रविवारपासून पुकारलेले ‘काम बंद’ आंदोलन मंगळवारीही सुरूच आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी बसअभावी प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. बेस्टला बसगाड्यांचा पुरवठा करणारी कंपनी आणि तिच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांमधील वाद अद्यापही मिटलेला नाही. बेस्ट उपक्रम मात्र केवळ कारवाईचे आश्वासन देत आहे.
खासगी कंपनीकडून बेस्ट उपक्रमाला भाडेतत्वावरील बसगाड्यांचा पुरवठा करण्यात आला असून कंपनीनेच या बसगाड्या चालविण्यासाठी कंत्राटी पद्धतीने चालकांची नियुक्ती केली आहे. मात्र या बसगाड्यांमध्ये बेस्टने आपला वाहक नियुक्त केला आहे. भाडेतत्वारील बसगाड्या उभ्या करण्यासाठी काही आगार संपूर्णपणे खासगी कंपनीला आंदण देण्यात आले असून कंपनीने बसची देखभाल दुरुस्तीसाठी अभियांत्रिकी कर्मचारीही नियुक्त केले आहेत. वडाळ्यासह अन्य काही आगारांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळत नसून त्यांच्या खात्यावर भविष्य निर्वाह निधी जमा झालेला नाही. यामुळे हे कर्मचारी संतप्त झाले असून गेल्या काही महिन्यांपासून याविरोधात ते वारंवार ‘काम बंद’ आंदोलन करीत आहेत. गेल्या रविवारपासूनही वडाळा आगारातील कंत्राटी चालकांसह अन्य कर्मचाऱ्यांनी ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. मंगळवारीही आंदोलन सुरूच आहे. यामुळे वडाळा आगारातून मंगळवारी सकाळपासून भाडेतत्त्वावरील बेस्ट बस बाहेर पडल्या नाहीत. वडाळा रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या आणि तेथून अन्य मार्गावरही चालवल्या जाणाऱ्या मार्गावरील प्रवाशांचे हाल होत आहेत. सकाळच्या सुमारास अवघ्या तीन बस वडाळा आगारातून निघाल्या होत्या. दुपारनंतरही अशीच परिस्थिती होती. प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी उपक्रमाने स्वमालकीच्या बस सोडल्या.
बस अभावी प्रवाशांना थांब्यावर बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागत आहे. वेतनासह अन्य मागण्यांची पूर्तता होत नसल्याने खासगी कंपनी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वादात प्रवाशांचे हाल होत आहेत. आंदोलनामुळे वडाळा आगारातून रविवारी ४८, सोमवारी ६३ बस बाहेर पडल्या नाहीत.