मुंबई : मेट्रो २ अ (दहिसर ते अंधेरी पश्चिम) आणि ७ (दहिसर ते गुंदवली) मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता विमाकवचाचा लाभ मिळणार आहे. प्रवाशांना वार्षिक सर्वसमावेशक विमा पॉलिसी महा मुंबई मेट्रो संचालन महामंडळामार्फत (एमएमएमओसीएल) देण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार अपघात वा कोणतीही दुर्घटना घडल्यास मृत वा जखमींना आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
निर्णयानुसार एखादा अपघात झाला वा दुर्घटनेत एखादा प्रवासी रुग्णालयात दाखल झाल्यास त्याला जास्तीत जास्त १ लाख रुपये तर बाह्यरुग्णांसाठी १० हजार रुपयांपर्यंतची भरपाई मिळणार आहे. तसेच बाह्यरुग्ण उपचार आणि रुग्णालयात दाखल असल्यास रुग्णालयातील संरक्षणाव्यतिरिक्त बाह्यरुग्ण उपचार खर्च कमाल रु. १०००० पर्यंत दिला जाणार आहे. तर किरकोळ दुखापतीच्या भरपाईसह वैद्यकीय खर्चाअंतर्गत जास्तीत जास्त रु. ९०००० इतकी भरपाई देण्यात येणार आहे. त्याच वेळी अपघातादरम्यान प्रवाशाचा मृत्यू झाल्यास ५ लाख रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे.
‘त्या’ घटनांसाठी कवच नाही
विमाकवचाचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांकडे वैध तिकीट, पास, स्मार्ट कार्ड वा क्यूआर कोड असणे आवश्यक असणार आहे. मुंबई मेट्रो स्थानकाची इमारत, फलाट किंवा मेट्रो गाडय़ांमध्ये किंवा स्थानक परिसरात अपघात घडल्यास या योजनेचा लाभ मिळणार आहे. पण मेट्रो स्थानक, इमारतीचे बाह्य क्षेत्र जसे की पार्किंग इत्यादी ठिकाणी काही अनिश्चित घटना, अपघात घडल्यास या विमा कवचाचे संरक्षण त्या व्यक्तीला लागू होणार नाही.