दोन दशकांपूर्वी युती सरकारच्या काळात तत्कालीन परिवहनमंत्री प्रमोद नवलकर यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या आणि आणीबाणीच्या काळात रेल्वेला पर्याय ठरलेल्या एसटी महामंडळाच्या ठाणे-मंत्रालय इंटरसिटी सेवा दोन दशकांनंतर पुन्हा एकदा युती सरकारच्या काळातच बंद पडणार आहेत. या इंटरसिटी सेवांना प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद असतानाही किमान ३५ प्रवाशांनी पास काढावा, अशी अट एसटी महामंडळाने ठेवली आहे. ठाण्याहून मंत्रालयापर्यंत गेल्यावर या गाडय़ा रिकाम्याच परत येतात. त्यामुळे एसटीचे नुकसान होत असल्याचे कारण सांगत एसटीने हा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाबाबत प्रवाशांमध्ये प्रचंड संताप असून सोमवारी या संतापाचा उद्रेकही ठाण्यात झाला.   ६ जुलैपासून वृंदावन सोसायटी-मंत्रालय आणि रेतीबंदर-मंत्रालय या ठाण्याहून सुटणाऱ्या बसगाडय़ा बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने या बसगाडय़ांमध्ये अक्षरश: डकवला आहे. किमान ३५ प्रवासी या बसचा पास काढण्यासाठी तयार असतील, तरच एसटी ही सेवा सुरू ठेवणार आहे. मात्र प्रवाशांनी या पास प्रकरणाला नकार दिला आहे. संध्याकाळी परतण्याच्या वेळी या सेवा नसतात. मग एकतर्फी प्रवासासाठी पास काढण्यात मतलब नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे . सोमवारी प्रवासी व एसटी अधिकारी यांच्यात यावरून वादावादी झाली. प्रवाशांनी जादा बस सोडण्याची मागणी केली. याबाबत एसटीच्या वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक कॅ. विनोद रत्नपारखी यांच्याशी संपर्क साधला असता प्रवाशांनी आपली मागणी लेखी स्वरूपात एसटीकडे दिल्यास याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

Story img Loader