‘सीएसटी’ स्थानकात प्रवाशांकडून पाण्याचा अपव्यय
भीषण पाणीटंचाईमुळे राज्य दुष्काळात होरपळत असून अनेक नागरिक शहरांमध्ये स्थलांतर करत आहेत. या परिस्थितीचा फटका मुंबईलाही बसला असून मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेल्या मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकातही पाणीटंचाईमुळे टँकरद्वारे पाणी मागवावे लागत आहे. या परिस्थितीतही प्रवाशांची सोय म्हणून स्थानकावर एक खासगी पाणपोई उभारण्यात आली आहे. मात्र, या पाणपोईवरून पाणी पिताना घरात काटकसर करणारे प्रवासी पाण्याची नासाडी करत असून दररोज काही हजार लिटर पाणी वाया जात आहे.
राज्यावरील दुष्काळाचे संकट गहिरे झाले असून राजधानी मुंबईतही पाणी जपून वापरावे लागत आहे. देशातील प्रमुख स्थानक असलेल्या मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकालाही पाणीटंचाईचा फटका बसला आहे. या स्थानकात मध्य रेल्वेचे मुख्यालय असून येथे २३ लाख लिटर पाण्याची आवश्यकता असताना दररोज येथे ८-९ लाख लिटर पाण्याचाच पुरवठा होतो. त्यामुळे या स्थानकात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. याबाबत ‘लोकसत्ता मुंबई’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. अशी परिस्थिती असूनदेखील प्रवाशांच्या सेवेसाठी प्रकाश पाडिया या व्यक्तीने आपल्या आईच्या स्मरणार्थ स्थानकात एक पाणपोई सुरू केली. मात्र, येथे तहान भागवण्यासाठी आलेले प्रवासी मात्र बिनदिक्कत या पाण्याची नासाडी करत आहेत. या पाणपोईला रेल्वेकडून नळ जोडणी देण्यात आली असून पाणपोईतून आम्ही पोलीस चौकीसाठीही पाणी घेतो, मात्र येथे येणाऱ्या प्रवाशांना कोणतीही शिस्त नसल्याने या पाण्याची नासाडी होते. याची बातमी कृपया करू नका, अथवा रेल्वे ही पाण्याची जोडणी येथून काढून टाकेल व आमचीही आबाळ होईल असे या पोलिसांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे, एका व्यक्तीने चांगल्या हेतूने ही पाणपोई बसविली खरी पण, दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य नसलेले प्रवासी मात्र येथील पाण्याची उधळपट्टी करत असल्याचे दिसून आले.
हजारो लिटर पाणी वाया
सीएसटी येथील पाणपोईवर पिण्याच्या थंड पाण्याचे चार-पाच नळ असून हे नळ सुरूच ठेवून जाणे, तेथेच गुळण्या करणे, नळालाच तोंड लावून पाणी पिणे यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. अनेक प्रवासी हे पाणी पीत असल्याने पाण्याने आजू-बाजूचा परिसर भिजून गेलेलाही दिसतो. हा प्रकार इथवरच थांबलेला नसून येथे साखळीला जोडलेले पाण्याचे पेले चोरून नेणे, त्याच्या साखळ्या नेणे आदी प्रकार येथे रात्री उशिरा येणारे गर्दुल्ले करत असल्याचेही या पाणपोई शेजारी असलेल्या पोलीस चौकीतील पोलिसांकडून सांगण्यात येते.
संकेत सबनीस