मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) १४ पारपत्र अधिकाऱ्यांसह ३२ जणांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत १२ गुन्हे दाखल केले होत. याप्रकरणी सीबीआयने गेले दोन दिवस एका दलालाच्या घरी व कार्यालयात शोध मोहीम राबवली. त्यात रोख एक कोटी ५९ लाख रुपये, पाच डायऱ्या व डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत. मंबईतील लोअर परळ आणि मालाडच्या पारपत्र सेवा केंद्रांमधील (पीएसके) १२ अधिकारी १८ पारपत्र दलालांच्या संपर्कात होते. संबंधित अधिकारी अपुऱ्या कागदपत्रांवर व बनावट कागदपत्रांवर दलालांच्या ग्राहकांना पारपत्र जारी करीत असल्याचा आरोप आहे.
परळ व मालाड येथील पारपत्र सेवा केंद्रांत २६ जून रोजी सीबीआयच्या अधिकाऱ्यांसह दक्षता विभागाचे अधिकारी व विभागीय पारपत्र कार्यालयातील अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी केली. यावेळी संशयीत अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील दूरध्वनी संच व मोबाइलची तपासणी करण्यात आली. कार्यालयातील कागदपत्रे, समाज माध्यमांवरील संदेश व युपीआयवरील व्यवहारांचीही तपासणी करण्यात आली. त्याच्या विश्लेषणातून संबंधित अधिकाऱ्यांचे दलालांसोबत काही व्यवहार आढळले. दलालांचे काम करण्याच्या बदल्यात हे व्यवहार झाल्याचा संशय आहे.
हेही वाचा – पाच महिन्यांत राज्यात एक हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी केली आत्महत्या
हेही वाचा – मुंबई महापालिकेत बदल्यांचे वारे
अपुरी कागदपत्रे, बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र जारी करण्याचा मोबदला म्हणून संबंधित व्यवहार झाल्याचा आरोप आहे. हे व्यवहार अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक, तसेच कुटुंबातील सदस्यांच्या बँक खात्यात झाल्याचे दिसून आले. ही रक्कम लाखो रुपयांमध्ये आहे. सीबीआयने २९ जून रोजी मुंबई आणि नाशिक येथे आरोपी अधिकारी व दलालांच्या सुमारे ३३ ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यात पारपत्रांशी संबंधित अनेक संशयीत कागदपत्रे व डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी सीबीआयची कारवाई सुरू असून ३० जून व १ जुलै रोजी एका दलालाचे कार्यलय व निवासस्थानी छापे टाकण्यात आले होते. त्यात रोख एक कोटी ५९ लाख रुपये, पाच डायऱ्या व डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत. या डायऱ्यांमध्ये काही व्यवहारांची माहिती आहे. त्याची पडताळी सीबीआयकडून सुरू आहे.