निधीपासून शासकीय कार्यालये सुरू करण्यावरून मंत्री वा खासदार-आमदार किती आग्रही असतात हे नेहमीच बघायला मिळते. उपविभागीय म्हणजेच प्रांत कार्यालय सुरू करण्यावरून आर. आर. पाटील आणि डॉ. पतंगराव कदम या दोन सांगलीकरांमध्ये चांगलीच जुंपली होती. शेवटी मंत्रिमंडळाने आर. आर. आबांच्या कवठे-महांकाळऐवजी जत तालुक्यात प्रांत कार्यालय सुरू करण्याचा आणि आबांचा मतदारसंघ हा मिरजच्या प्रांत कार्यालयाशी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
सर्वसामान्य जनतेची कामे लवकर व्हावीत किंवा त्यांना शासकीय कामांसाठी दूरवर जावे लागू नये म्हणून प्रत्येक दोन तालुक्यांसाठी उपविभागीय कार्यालये (प्रांत) सुरू करण्याचा निर्णय महसूल खात्याने घेतल्यापासून त्याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले.
उपविभागीय कार्यालय त्याच तालुक्यात का, आमच्या तालुक्यात का नाही, यावरून राजकारण सुरू झाले. परिणामी महसूल खात्याने प्रस्तावित केलेली सर्व कार्यालये अद्याप सुरू करणे शक्य झाले नव्हते. सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा भौगौलिकदृष्टया मोठा असल्याने या तालुक्यात प्रांत कार्यालय सुरू करण्याचे प्रस्तावित होते. पण गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी हे कार्यालय कवठे-महांकाळमध्ये सुरू करावे, असा आग्रह धरल्याने ही प्रक्रिया रखडली होती. मंत्रिमंडळाने जतमध्ये उपविभागीय कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा मदत व पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी पत्रकार परिषदेत केली.
भौगोलिक रचनेनुसार कवठे-महांकाळ तालुक्यात उपविभागीय कार्यालय सुरू करणे शक्य नव्हते. यामुळेच जतचा पर्याय मान्य करण्यात आला.
सांगली महापालिका जिंकल्यानंतर जतमध्ये उपविभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी मान्य करून घेऊन डॉ. कदम यांनी जिल्ह्यात आपले महत्त्व वाढेल याची खबरदारी घेतली आहे.

Story img Loader