मुंबई : मुंबईतील हिरे व्यापार, एअर इंडिया मुख्यालय इतरत्र स्थलांतरित केल्यानंतर आता केंद्रीय वाणिज्य, उद्याोग मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारे बौद्धिक संपदा हक्क (पेटंट) मुख्यालय दिल्लीला हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबईत (सध्या अॅन्टॉप हिल) ५० वर्षे असलेल्या या मुख्यालयात देश विदेशातील सरासरी एक लाखपेक्षा जास्त पेटंट मंजुरीसाठी येत असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पेटंट मुख्यालय दिल्लीला गेल्याने मुंबईचे महत्त्व कमी होणार आहे. जगातील उद्याोजकांच्या नवीन आविष्काराला मान्यता देण्यासाठी आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत केंद्रीय वाणिज्य व उद्याोग मंत्रालयाच्या पेटंट, डिझाइन, आणि ट्रेडमार्क (सीजीपीडीटीएम) मुख्यालय सध्या वडाळा अॅन्टॉप हिल येथे आहे. काही वर्षांपूर्वी हे मुख्यालय परळ येथे होते.

तीन महिन्यांत स्थलांतर

१९७०च्या दशकात देशातील सहा मोठ्या शहरांत पेटंट, डिझाइन आणि ट्रेडमार्क मान्यतेसाठी कार्यालये सुरू करण्यात आलेली आहेत. या ठिकाणी देशातून आणि काही परदेशातून एक लाखापर्यंत पेंटटसाठी अर्ज येत असतात. हे मुख्यालय दिल्लीला हलविण्याचा निर्णय एका वरिष्ठ अधिकाऱ्याने घेतला आहे. पहिल्यांदा हे मुख्यालय अहमदाबाद येथे हलविण्यात येणार होते पण राजकीय विरोध लक्षात घेऊन हे मुख्यालय आता दिल्ली येथील द्वारका भवन येथे हलविण्याचा आदेश डिसेंबर महिन्यात काढण्यात आला आहे. तीन महिन्यात हे मुख्यालय स्थलांतरित करण्याचे आदेश आहेत. याबाबत प्रतिक्रियेसाठी केंद्रीय वाणिज्य व उद्याोगमंत्री पीयूष गोयल यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मुख्यालयात २४० अधिकारी व कर्मचारी संख्या आहे. मुंबईच्या मुख्यालयात पेटंट देण्याचे काम अतिशय काटेकोरपणे चालते. त्यासाठी ३२ महिने पेटंट तपासणी प्रक्रिया सुरू असते. मुंबईतील मुख्यालय दिल्लीला हलविल्याने अनेक समस्या निर्माण होणार आहेत. पेटंट देण्याबरोबरच दोन पेटंटमधील वाद मिटविण्याचे काम या मुख्यालयात पार पडते. पेटंट, डिझाइन, आणि ट्रेडमार्क बद्दल धोरणात्मक निर्णय या मुख्यालयात घेतले जात असतात.

हे मुख्यालय इतरत्र कुठेही स्थलांतरित केल्याने मुंबईचे महत्त्व कमी होणार आहे. जगातील उद्याोजक, संशोधक देशात पेटंट घेण्यासाठी मुंबईत येतात. त्यावेळी ते गुंतवणुकीच्या दृष्टीनेही महाराष्ट्राकडे पाहात असतात. हा दृष्टिकोन बदलणार आहे.

अॅड. पराग मोरे, ( पेटंट, डिझाइन, ट्रेडमार्कविषयक वादविवादातील वकील)

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patent office shifted to delhi from mumbai css