लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : काही महिन्यांपूर्वी आरेमधील दुग्ध वसाहत आणि आसपासच्या परिसरातील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले. मात्र, काँक्रीटीकरण केलेल्या काही रस्त्यावर भेगा पडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
खड्डेमुक्त मुंबईचे उद्दिष्ट ठेवून महानगरपालिका प्रशासनाने मुंबईतील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर आरेमधील अंतर्गत रस्त्यांचेही कॉंक्रीटकरण करण्यात आले. आरे दुग्ध वसाहतीत २७ आदिवासी पाडे आणि रॉयल पाम्स क्षेत्र आहे. काही महिन्यांपूर्वी या परिसरात रस्त्याच्या कॉंक्रीटकरणाचे काम पूर्ण झाले. दरम्यान, अवघ्या काही महिन्यांतच येथील रस्त्यांची पुन्हा दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप शिवसेनेचे (ठाकरे) शाखाप्रमुख आणि आरेमधील रहिवासी संदीप गाढवे यांनी केला आहे. काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यांवर अवघ्या काही महिन्यांतच भेगा पडू लागल्या आहेत, असेही ते म्हणाले. पावसाळ्यात हे रस्ते आणखी खराब होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या रस्त्यांची गुणवत्ता तपासणी करावी आणि संबंधित कंत्राटदाराविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी गाढवे यांनी सोमवारी रस्ते विभागातील अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
यापूर्वी कॉंक्रीटकरण केलेल्या रस्त्यावर खड्डे
काही महिन्यांपूर्वी आरे मार्गावरील मॉडर्न बेकरी बस थांबा ते आरे रुग्णालय या परिसरातील रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू होते. काही भागात काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यावर पुन्हा खड्डे खोदण्यात आले आणि त्या खड्ड्यांवर मातीचा भराव टकल्यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले होते. तसेच वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत होता. सुमारे आठ ते दहा खड्डे खोदण्यात आले होते. रस्त्यांवर अनेक ठिकाणी रस्ता रोधक (बॅरीकेट्स) उभे करण्यात आले होते. यामुळे वाहनांना अडथळा निर्माण होत होता. खड्डे बुजविण्यासाठी मातीचा वापर करण्यात आल्याने आसपासच्या परिसरात धुळीचे साम्राज्य पसरत होते.
रहिवासी नाराज
कॉंक्रीटीकरण केल्यानंतर रस्त्यावर तडे कसे जातात, असा सवाल रहिवाशांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईकरांना रुंद, खड्डेमुक्त आणि दर्जेदार रस्त्यांच्या माध्यमातून वेगवान प्रवासाची अनुभूती मिळावी, यासाठी मुंबईतील सर्व रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी आरेमधील रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण झाल्यामुळे संबंधित भागातील रहिवाशांना दिलासा मिळाला होता. मात्र, पुन्हा कॉंक्रीटीकरण केलेल्या रस्त्यांना पडलेले तडे आणि खोदकाम करण्यात आल्यामुळे रहिवासी संतप्त झाले आहेत.
वाहतूक कोंडीमुळे त्रस्त
रस्त्यावर सतत करण्यात येणारे खोदकाम, कॉंक्रीटकरणामुळे सकाळी आणि सायंकाळी रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी यामुळे पादचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
उच्च न्यायालयाचे आदेश काय ?
आरे दुग्ध वसाहतीतील अंतर्गत रस्ते अत्यंत दयनीय स्थितीत आहेत, असे निरीक्षण नोंदवून त्याच्या दुरुस्ती आणि देखभालीची कामे तातडीने हाती घेण्याचे आदेश गेल्या वर्षी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. आरे वसाहतीतील ४५ किमी लांबीच्या रस्त्यांच्या दयनीय स्थितीची दखल घेऊन त्यांच्या सर्वेक्षणासाठी आणि त्याच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीची शिफारस सुचवण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती. या समितीने अहवाल सादर करून रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीबाबत शिफारसी केल्या होत्या. समितीने सादर केलेल्या अहवालात, ४५ किमीपैकी ११.९८ किमी रस्त्याचा भाग आरक्षित वनक्षेत्रात मोडत असल्याचे आणि १९.१७ किमीचा रस्ता तातडीने दुरुस्ती करण्याची शिफारस केली होती.