पावसाळ्यात मुंबईमधील रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजविण्याच्या ५० कोटी रुपयांच्या कामाचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे सादर करण्यास प्रशासनाला अखेर शुक्रवारचा मुहूर्त सापडला असून स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजूरी दिली. मात्र खड्डय़ांची ही दुरुस्ती महापालिकेला भलतीच महागात पडण्याची चिन्हे आहेत.
पावसाळा अगदी तोंडावर आला असताना प्रशासनाने हा प्रस्ताव घाईघाईने स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी आणून मंजुरी मिळविली.
दक्षिण मुंबईमध्ये प्रतीचौरस खड्डा बुजविण्यासाठी १५१५ ते १३७८ रुपये, पूर्व उपनगरात ११५१ ते १०९८, तर पश्चिम उपनगरात १०६१ ते ९९९ रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. यावरुन दक्षिण मुंबईमधील खड्डे पालिकेला महागात पडण्याची चिन्हे आहेत. ही कामे तीन कंत्राटदारांना देण्यात आली आहेत.
गिरगावपासून कुल्याब्यापर्यंतचे प्रतीमीटर खड्डे बुजविण्याचा खर्च पालिकेला भलताच महागात पडत असल्याबद्दल समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी प्रशासनाला धारेवर धरले. पूर्व उपनगरांमधील रस्त्यांच्या दुरुस्तीचे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानंतर प्रशासनाने फेरनिविदा काढाव्या लागल्या. त्यामुळे ११७ रस्त्यांची कामे लांबणीवर पडली, असे भाजपचे नगरसेवक मनोज कोटक यांनी हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे निदर्शनास आणून दिले. ही कामे एप्रिलमध्येच सुरू झाली असती तर त्या रस्त्यांची जबाबदारी त्या कंत्राटदारांवर पडली असती, असेही ते म्हणाले.
गेल्या वर्षी बुजविलेला खड्डा पुन्हा उखडला गेला असल्यास त्याच कंत्राटदाराला स्वखर्चाने तो भरून द्याला लागेल. त्यासाठी जुन्या कंत्राटदारांची अनामत रक्कम परत देण्यात आलेली नाही, असे अतिरिक्त आयुक्त असीम गुप्ता यांनी सांगितले. उपनगरांतील रस्त्यांची दुरुस्ती झाल्यानंतर पुढील तीन वर्षे त्याबाबत कोणतीच समस्या उद्भावणार नाही, असेही ते म्हणाले.

मोनो-मेट्रोच्या खोदकामामुळे प्रवास जिकीरीचा
पावसाळ्यात मोनो तसेच मेट्रो रेल्वे प्रकल्पांची कामे सुरू असली तरी आतापर्यंत रस्त्यावर खोदकामास परवानगी नव्हती. यावर्षी या प्रकल्पांसाठी रस्त्यावर खोदकाम करण्यास परवानगी देण्यात आली असून परिणामी पावसाळ्यात मोनो-मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू असलेल्या परिसरांमध्ये रस्त्यांवरून प्रवास करणे जिकीरीचे ठरणार आहे.