मुंबई : जुनी निवृत्ती वेतन योजना पुन्हा लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा सर्वाधिक परिणाम रुग्णालयीन सेवेवर झाला असून शुक्रवारी मुंबईतील जे.जे., सेंट जॉर्जेस, जी.टी. आणि कामा रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसंख्येत घट झाली, तर शस्त्रक्रियांवरही परिणाम झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संपाच्या पहिल्या दिवसापासून रुग्णालयीन सेवेवर परिणाम होत आहे. शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी त्याची तीव्रता वाढल्याचे चित्र होते. रुग्णालयातील अनेक सेवा ठप्प असून रुग्णांनीच रुग्णालयाकडे पाठ फिरविल्याचे बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसंख्येवरून दिसले. जे. जे. रुग्णालयामध्ये बाह्यरुग्ण विभागात  दररोज चार हजारांहून अधिक रुग्ण उपचारासाठी येतात, मात्र शुक्रवारी १८०० रुग्णच उपचारासाठी आले. जी.टी. रुग्णालयामध्ये दररोज साधारणपणे एक हजार रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येतात, मात्र शुक्रवारी ४५० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात तपासण्यात आले होते, तर अपघात विभागामध्ये ७६ रुग्णांवर उपचार करण्यात आले. सेंट जॉर्जेस रुग्णालयातही शुक्रवारी बाह्यरुग्ण विभागात १२७ रुग्ण आले होत़े

काय घडले?

  • अनेक सरकारी रुग्णालयांतील रुग्णसेवेला फटका
  • बाह्यरुग्ण विभागांत रुग्णघट, शस्त्रक्रिया लांबणीवर  
  • सफाई कामगारांअभावी रुग्णालयांच्या आवारांमध्ये कचऱ्याचे ढीग

‘जेजे’मध्ये केवळ १६ शस्त्रक्रिया

संपाच्या पहिल्या दिवसापासून सर्व रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक आणि महत्त्वाच्या शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. जे.जे. रुग्णालयात शुक्रवारी अवघ्या १६ शस्त्रक्रिया करण्यात आल्या, तर जी.टी आणि सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये बहुतांश शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या.

रुग्णालयांत लवकरच कंत्राटी भरती

संपामुळे ठप्प झालेली रुग्णसेवा सुरळीत व्हावी यासाठी रुग्णालयांमध्ये तातडीने तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कक्ष सेवक, शिपाई, सफाई कामगार यांची कामे या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून करून घेण्यात येणार असल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.

कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वाढ..

संपाच्या चौथ्या दिवशी आरोग्य विभागात कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. तिसऱ्या दिवसाच्या तुलनेत ही वाढ २.२४ टक्के एवढी आहे. त्यांत क वर्गातील कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patient care collapses strikes affect surgeries decrease in number of patients care units ysh