ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारीकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी सलग दुसऱ्या दिवशीही येथील डॉक्टरांनी काम आंदोलन सुरू ठेवले आहे. यावर उपाय म्हणून रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागाचे कामकाज कंत्राटी डॉक्टरांमार्फत सुरू ठेवण्याचा प्रयत्न व्यवस्थापनाने करून पाहीला. मात्र, रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नियमित डॉक्टरांची अनुपस्थिती जाणवत होती. दरम्यान, दोषींवर ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा येथील डॉक्टरांनी दिला आहे.
मुंब्रा येथील अमृतनगर भागात शनिवारी रात्री दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. यामध्ये पोटात चाकू लागून जखमी झालेल्या अहमद शेख याला जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात दाखल होण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी त्याच्या नातेवाईकांना सांगितले. त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड करत दोन डॉक्टर, परिचारीका आणि वॉर्डबॉय, आदींना मारहाण केली. यामध्ये डॉ. वृषभ जैन यांच्या कानचा पडदा फाटला, तर डॉ. बजरंग सिंग यांच्या छाती व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. परिचारीका कृपा विशे यांच्याही डोक्याला इजा झाली असून वॉर्ड बॉय पाटील याला मुकामार लागला आहे. या चौघांवरही जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेच्या निषेधार्थ रविवारपासून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनीकाम बंद आंदोलन सुरू केले होते. सोमवारी या आंदोलनातून कर्मचाऱ्यांनी माघार घेत काळ्या फिती लावून काम सुरू केले. डॉक्टरांनी मात्र आंदोलन सुरूच ठेवले आहे. असे असले तरी रुग्णालयातील अतिदक्षता विभाग, प्रसुतीगृह, अपघात कक्ष, असे महत्वाचे विभाग सुरू ठेवण्यात आले असून कंत्राटी डॉक्टरांच्या माध्यमातून बाह्य रुग्ण विभागाचेही कामकाज सुरू आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
डॉक्टरांच्या आंदोलनामुळे रुग्णांचे हाल
ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारीकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी सलग दुसऱ्या दिवशीही येथील डॉक्टरांनी काम आंदोलन सुरू ठेवले आहे.
![डॉक्टरांच्या आंदोलनामुळे रुग्णांचे हाल](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2013/07/mum086.jpg?w=1024)
First published on: 23-07-2013 at 03:42 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patient suffer badly after thane district doctor strike