अनावश्यक स्टिरॉईड आणि प्रतिजैविकयुक्त मलमामुळे निर्मिती होत असल्याचे तज्ज्ञांचे मत
अनावश्यक स्टिरॉईड आणि प्रतिजैविकयुक्त मलमामुळे घाम किंवा ओलसरपणामुळे पोट, कंबर, काख आदी शरीराच्या भागांमध्ये होणाऱ्या बुरशीच्या संसर्गाच्या आजाराने गंभीर स्वरूप धारण केले असून, तो आता औषधांना दाद देईनासा झाला असल्याचे निरिक्षण त्वचारोगतज्ज्ञांनी नोंदविले आहे. बुरशीचा संसर्ग झटपट बरा करण्याच्या नादात या मलमाचा वापर सर्रासपणे केला जात असून त्याचे त्वचेवर गंभीर परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे.
केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने नुकतीच स्टिरॉईड आणि प्रतिजैविकयुक्त अशा १४ मलमांच्या विक्रीवर र्निबध आणले असून ही औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देण्यास मनाई केली आहे. भारतामध्ये स्टिरॉईड आणि प्रतिजैविक मलमाचा सर्रास वापर होत असल्याने हे र्निबध आणण्यात आले आहेत.
बुरशीचा संसर्ग झाल्यानंतर बहुतांश वेळा रुग्ण औषधविक्रेत्यांकडून किंवा स्थानिक डॉक्टरांकडून यावर औषधोपचार घेतात. यामध्ये रुग्णांना बऱ्याचदा संसर्ग लगेचच बरा होण्यासाठी स्टिरॉईड आणि प्रतिजैविकयुक्त मलमे दिली जातात. मात्र या अनावश्यक मलमांमुळे त्वचेला गंभीर इजा होत असल्याची तक्रार घेऊन येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण गेल्या वर्षभरापासून वाढले आहे. दिवसाला जवळपास ४० रुग्ण अशा तक्रारी घेऊन येतात. यामध्ये बऱ्याचदा रुग्णांनी औषधविक्रेत्यांकडून किंवा अशा प्रकारचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या सल्ल्यानुसार हे मलम वापरलेले असते, असे ऐरोलीच्या त्वचारोगतज्ज्ञ आणि सौंदर्यप्रसाधनेतज्ज्ञ डॉ. वृषाली सुरवाडे यांनी सांगितले.
बुरशीच्या संसर्गासाठी स्टिरॉईडयुक्त मलम वापरणे काही प्रमाणात आवश्यक असते. मात्र सध्या बाजारामध्ये स्टिरॉईड, प्रतिजैविक आणि बुरशीरोधी या तिहेरी औषधांच्या संयोजनातून तयार केलेली मलमे उपलब्ध आहेत. रुग्ण बऱ्याचदा अशा प्रकारच्या संसर्गाचे अचूक निदान न करता या औषधांचा वापर करतात. त्यामुळे औषधांना दाद न देणारा बुरशीचा प्रकार तयार होत असल्याचे आढळून येत आहे. केईएममध्ये दिवसभरामध्ये जवळपास ५०-६० रुग्णांमध्ये अशा औषधाला दाद न देणारा बुरशीचा संसर्ग दिसून येत आहे, असे केईएम रुग्णालयातील त्वचारोग विभागाचे प्रमुख व प्राध्यापक डॉ. उदय खोपकर यांनी सांगितले.
बुरशीच्या संसर्गाचे विविध प्रकार असून याचे कोणतेही निदान न करता सर्रासपणे या मलमाचा वापर केला जात आहे. या औषधांनी काही दिवसातच संसर्ग बरा होत असल्याचे सुरुवातीला आढळून आले असले तरी नंतर मात्र त्वचेवर गंभीर इजा पोहचत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये त्वचेवर पांढरे चट्टे येणे, पुरळ येणे, त्वचा लालसर होणे इथपासून ते त्वचा पातळ होऊन आतील पेशी दिसणे इथपर्यंतचे गंभीर परिणाम रुग्णांमध्ये आढळून आले आहेत. हा संसर्ग अगदी जन्मजात बाळ, लहान मुलांमध्येही हल्ली आढळून येत आहे, असे इंडियन असोसिएशन ऑफ डरमॅटोलॉजिस्ट, वेनेरेलॉजिस्ट आणि लॅपरोलॉजिस्ट या संस्थेचे राज्य सचिव डॉ. मुकादम यांनी सांगितले.
उजळ त्वचेसाठी वापरल्या जाणाऱ्या मलमामुळे लागण
बुरशीचा संसर्ग हा मुख्यत: शरीरामध्ये ओलसरपणा असलेल्या ठिकाणी होत होता. मात्र आता हा संसर्ग शरीरात कोरडय़ा भागांवर म्हणजे चेहरा, मान आदी ठिकाणीही होत असल्याचे मोठय़ा प्रमाणावर आढळून येत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे उजळ त्वचेसाठी वापरली जाणारी स्टिराईडयुक्त मलम किंवा क्रीम. या मलमाच्या सततच्या वापरामुळे त्वचेची प्रतिकारशक्ती कमी होऊन त्या भागामध्ये लगेचच बुरशीचा संसर्ग पसरतो. यामध्ये रुग्णांच्या चेहऱ्यावर केस येणे, पुरळ येणे, त्वचा पांढरी पडणे, लाल चट्टे येणे असे गंभीर परिणाम दिसून आले आहेत.
अशी काळजी घ्या
- औषधविक्रेते किंवा असा आजार झालेल्या व्यक्तीच्या सल्ल्याने औषधे घेऊ नये. त्वचारोगतज्ज्ञांच्या मदतीने संसर्गाचे योग्य निदान करून घ्या
- संसर्ग बरा झाल्याचे दिसून आले तरीही पूर्ण उपचार घ्या.
- संसर्ग झालेल्या व्यक्तीचे कपडे किंवा वैयक्तिक वस्तू कुटुंबातल्या इतर व्यक्तींनी वापरू नयेत.