मुंबई: नागरिकांमधील मानसिक आरोग्याशी संबंधित रूग्णांची तपासणी, समुपदेशन, उपचार व पाठपुरावा करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यां’मध्ये एप्रिल २०२३ पासून मानसोपचार सेवा पुरविण्यात येत आहे. ‘आपला दवाखान्यां’मध्ये २ हजार ४७१ जणांनी मानसिक आरोग्यविषयक उपचार घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मानसिक आजारामुळे माणसांचे विचार, वर्तन आणि भावनिक नियंत्रण यामध्ये अडथळे येतात. विचारांचा आणि भावनांचा योग्य मेळ न बसल्याने मानसिक संतुलन बिगडते. समाजात मानसिक रुग्ण हा लोकांच्या हेटाळणीचा विषय असल्याने मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे ७ एप्रिल २०२३ पासून १९० दवाखाने व १३५ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांमध्ये मानसोपचार सेवा उपलब्ध केली. या दवाखान्यातील ४६२ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मानसिक आरोग्यासंबंधी प्रशिक्षण देण्यात आले आहे. एप्रिलपासून आतापर्यंत नवीन दोन हजार ४७१ संशयित मानसिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ३४७ सौम्य आणि ४१ गंभीर स्वरूपाचे रुग्ण आढळले. एकूण २११ रुग्णांना पुढील उपचारासाठी महानगरपालिका रुग्णालयांमध्ये वर्ग करण्यात आले आहे, तर १ हजार ४०० रुग्णांचे समुपदेशन व पाठपुरावा करण्यात आला.

हेही वाचा… फडणवीस यांचा व्हिडीओ दाखवत पनवेल, मुलुंड टोलनाक्यांवर मनसे कार्यकर्त्यांचे टोल न भरण्याचे वाहन चालकांना आवाहन

जगभरात मानसिक आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार इतर आजारांच्या तुलनेत मानसिक आजाराचे प्रमाण १४ टक्के आहे. जगात दर ८ पैकी एक व्यक्ती मानसिक आजाराने त्रस्त आहे. ही बाब लक्षात घेता महानगरपालिकेच्या वतीने मानसिक आजारांवरील उपचारांना देखील प्राधान्य दिले जात आहे. महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालय व वैदकीय महाविद्यालयांमध्ये मानसिक आरोग्यसंबंधी रुग्ण सेवा देण्यात येत आहे. तसेच भरडावाडी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दरमहा अंदाजे ४०० व राजावाडी रुग्णालयात दरमहा अंदाजे ८०० रुग्णांना व्यसनमुक्ती उपचार करण्यात येत आहेत, असे सार्वजनिक आरोग्य खात्याच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी, डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले.

मानसिक आरोग्याची लक्षणे

उदास वाटणे, परीक्षेची चिंता, कामाच्या ठिकाणी तणाव, तणावात असताना दारू किंवा अमलीपदार्थांचे सेवन, वृद्धापकाळातील एकटेपणा, सतत आत्महत्येचा विचार येणे, ही मानसिक आरोग्य स्थिर नसल्याची लक्षणे आहेत.

हितगुज सेवेचा लाभ घ्यावा

महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयांतर्गत मानसोपचार विभागामार्फत २४ तास हितगुज हेल्पलाईन सेवा २४१३-१२१२ या क्रमांकावर कार्यरत आहे. या सुविधेचा लाभ घ्यावा, तसेच महानगरपालिकेच्या दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

काय करावे

कोणत्याही रुग्णामध्ये अशी लक्षणे दिसू लागताच त्यांनी स्वतःहून अथवा त्यांच्या नातेवाईकांनी वैद्यकीय सल्ला व संबंधितांवर उपचार घ्यावेत. मानसिक आजारांवर उपचार करताना ध्यान, योगासने व व्यायाम, व्यसनांपासून दूर राहणे, प्रसन्न व आनंदी मन, उत्तम नातेसंबंध व सुसंवाद, लक्षणे आढळताच त्वरित उपचारांना प्रारंभ या बाबी महत्त्वाच्या ठरतात.

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी विविध प्रकारे प्रसिद्धी व प्रचार करण्यात येत आहे. मानसिक आजाराची लक्षणे व मानसिक आजारांवर उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधा याबाबतची माहिती पोस्टर्सच्या माध्यमातून तसेच समाज माध्यमातून देण्यात येत आहे. तसेच रेडिओ जिंगलच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात माहिती प्रसारित करण्यात येत आहे. – डॉ. दक्षा शाह, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महानगरपालिका

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patients are taking mental health treatments in mumbai municipal clinics mumbai print news dvr
Show comments