मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्व उपनगरातील गोवंडी येथील मुंबई महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात कर्मचारी आणि डॉक्टरांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे रुग्णांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत अनेक निवेदने देऊनही महापालिका या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याने काही स्थनिक रहिवाशांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

शताब्दी रुग्णालयात गोवंडी, शिवाजी नगर, मानखुर्द, चेंबूर, आणि देवनार परिसरातील आठशे ते हजार रुग्ण दररोज तपासणीसाठी येत असतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. परिणामी रुग्णांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेकदा डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना राजावाडी, शीव अथवा खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागत आहे. या ठिकाणी ईसीजी तंत्रज्ञची जागा रिक्त असल्याने येथील सफाई कर्मचारी ईसीजी काढत असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता.

हेही वाचा >>>कोकण रेल्वेचे वेळापत्रक बिघडणार

कमी कर्मचाऱ्यांमुळे उपलब्ध असलेल्या कर्मचारी आणि डॉक्टरांवर कामाचा ताण येत आहे. यातूनच अनेकदा रुग्णांचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद होतात. याबाबत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे यांनी पालिकेला अनेकदा पत्रव्यवहार करून येथील समस्येवर तोडगा काढण्याची विनंती केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालयाबाहेर स्थानिक रहिवाशांसोबत आमरण उपोषण करण्याचा इशारा नगराळे यांनी दिला आहे.

Story img Loader