मुंबई : पाटण्यात झालेल्या विरोधकांच्या बैठकीत भाजपच्या विरोधात देश पातळीवर एकत्रित लढण्यावर विरोधकांचे एकमत झाल्याने राज्यातही महाविकास आघाडीला बळ मिळणार आहे. जागावाटपाचा तिढा सोडविण्याचे तिन्ही पक्षांसमोर मोठे आव्हान असेल.
पाटण्यातील बैठकीला राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह कार्याध्यक्ष प्रफुल पटेल व सुप्रिया सुळे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व संजय राऊत हे उपस्थित होते. या बैठकीत भाजपला पराभूत करण्याकरिता एकत्रित निवडणूक लढविण्यावर सहमती झाली. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र लढण्याचे तत्त्वत: मान्य केले असले तरी अधूनमधून स्वबळाचे नारे दिले जातात. पाटण्यातील बैठकीत एकत्र लढण्यावर सहमती झाल्याने राज्यात काँग्रेस नेत्यांना आघाडीचा निर्णय मान्य करावा लागणार आहे.
तीन पक्षांमध्ये एकत्र लढण्यावर एकमत असले तरी जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरला आहे. तिन्ही पक्षांना अधिकच्या जागा हव्या आहेत. तसेच कोणीच माघार घेण्यास तयार नाही. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि शिवसेनेचे संजय राऊत यांनी जागावाटपाचे सूत्र जाहीर करून टाकले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे सूत्र फेटाळून लावले आहे.
विरोधकांची बैठक म्हणजे ‘फोटो सेशन’, भाजपची टीका
नवी दिल्ली : पाटण्यामधील विरोधकांची बैठक म्हणजे नेत्यांचे ‘फोटो सेशन’ आहे. विरोधी पक्षांनी कितीही हातमिळवणी केली, तरी त्यांच्यामध्ये एकजूट होऊ शकत नाही. यदाकदाचित ऐक्य झालेच, तरीही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जनता भाजपला ३०० हून अधिक जागा मिळवून देईल आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी केला. एका बाजूला राहुल गांधी, तर दुसऱ्या बाजूला यशस्वी पंतप्रधान मोदी, लोक मोदींनाच मते देतील, असे सांगत शहांनी विरोधकांची महाआघाडी भाजपसाठी आव्हान नसल्याचे जम्मूमधील जाहीर सभेत सांगितले.