पत्रा चाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांना दसराही तुरुंगातच घालवावा लागणार आहे. संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. १० ऑक्टोबरलाच त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे. गटप्रमुखांच्या मेळाव्यात संजय राऊत अनुपस्थित असल्याने त्यांचं नाव असलेली खुर्ची रिकामी ठेवली होती. दसरा मेळाव्याच्या आधी संजय राऊत बाहेर येतील आणि तोफ धडाडेल अशी शिवसैनिकांनी अपेक्षा होती. पण कोठडीत वाढ झाली असल्याने शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात संजय राऊत हजर राहू शकणार नाहीत.
गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजाणी संचालनालयाने ( ईडी) ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती. संजय राऊत यांनी जामीन मिळावा यासाठी ईडीच्या पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर २७ सप्टेंबरला सुनावणी पार पडली होती. मात्र, कोर्टाने संजय राऊत यांना दिलासा दिला नव्हता. कोर्टाने जामीन अर्जावरील सुनावणी १० ऑक्टोंबरपर्यंत पुढे ढकलली होती.
पत्रा चाळ गैरव्यवहारात संजय राऊतांचा सहभाग
पत्रा चाळीतील १०३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सुरुवातीपासूनच सहभाग असल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केला आहे. या प्रकरणी ईडीने नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे. पत्रा चाळ पुनर्विकासात राऊत यांचा थेट सहभाग असून अगदी सुरुवातीपासून ते प्रत्येक गोष्ट कृतीत आणण्यात राऊत यांचा सहभाग असल्याचा दावा ईडीने आरोपपत्रात केला आहे.
हेही वाचा – पत्रा चाळ प्रकरणी सत्ताबदलानंतर म्हाडाकडून वादग्रस्त तपशील सादर
आरोपपत्रानुसार, २००६-०७ मध्ये पत्रा चाळीच्या पुनर्विकासाबाबत तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दोन बैठका झाल्या होत्या. त्यात संजय राऊत म्हाडा अधिकारी व इतरांसह सहभागी झाले होते. त्यानंतर राकेश वाधवान या प्रकरणात सहभागी झाले. या प्रकरणात नियंत्रण राहावे म्हणून संजय राऊत यांनी प्रवीण राऊत यांना मोहरा म्हणून मेसर्स गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक केले. सोसायटी, म्हाडा आणि मेसर्स गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात त्रिपक्षीय करार झाला होता, असेही ईडीने आरोपत्रात म्हटलं आहे.