मुंबई : गोरेगाव, सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेल्या पुनर्वसित इमारतीतील मूळ ६७२ रहिवाशांना घरांचा ताबा देण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे. या घरांचा ताबा देण्यासाठी मंडळाकडून काढण्यात येणारी सोडत रहिवाशांच्या विरोधामुळे रखडली होती. तसेच अनेक वेळा सोडत रद्द करण्यात आली होती. पण आता मात्र ४ एप्रिल रोजी सोडत काढण्याचा निर्णय घेऊन त्यादृष्टीने मंडळाने तयारी सुरू केली आहे. गोरेगाव येथे ६२९ घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे.
जवाहर सभागृहात सोडत
वादग्रस्त पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील अर्धवट अवस्थेतील पुनर्वसित आणि २०१६ च्या सोडतीतील घरांचा समावेश असलेल्या इमारतींच्या पूर्णत्वाचे काम मंडळाकडून काही वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले होते. त्यानुसार मूळ ६७२ भाडेकरूंसाठीच्या पुनर्वसित इमारतींचे बांधकाम मंडळाने काही महिन्यांपूर्वीच पूर्ण केले आहे.
बांधकाम पूर्ण झाल्यानंतर इमारतींना अंशत निवासी दाखला घेत घरांचा ताबा देण्याचा निर्णय मंडळाने घेतला. सोडत पद्धतीने घरांचा ताबा देण्यासाठी दोन-तीन वेळा तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र ६७२ घरांसाठी सोडत काढावी, ज्या घरांसाठी रहिवाशांकडून कागदपत्रे जमा झालेली नाहीत, ती सोसायटीच्या ताब्यात द्यावीत आणि पूर्ण निवासी दाखला मिळवावा अशा मागण्यांच्या पार्श्भूमीवर रहिवाशांकडून सोडतीला विरोध झाला. या विरोधामुळे मंडळाला सोडत रद्द करावी लागली होती. पण आता मात्र सोडतीबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता एस. व्ही. रोड येथील जवाहर नगर येथील जवाहर सभागृहात सोडत काढण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, ६२९ घरांसाठी रहिवासी पात्र ठरल्याने यावेळी ६२९ घरांसाठीच सोडत काढली जाणार आहे. उर्वरित घरे मुंबई मंडळाच्या ताब्यात राहतील. जसे रहिवाशी कागदपत्रे सादर करून पात्र ठरतील तसा त्या घरांचा ताबा दिला जाणार आहे.
अखेर इमारतीला निवासी दाखला
पुनर्वसित इमारतींना अंशत निवासी दाखला प्राप्त झाला होता. पण आता मात्र इमारतीला पूर्णत: निवासी दाखला मिळाल्याची माहिती मंडळातील सूत्रांनी दिली. पुनर्वसित इमारतींच्या प्रकल्पात मंडळाने अंदाजे ७२ दुकाने बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पूर्णत: निवासी दाखल्याची प्रतीक्षा होती. मात्र मंडळाने दुकानांचा प्रकल्पच रद्द केल्याने आता पूर्णत: निवासी दाखल्याचा मार्ग मोकळा झाला. आता निवासी दाखल्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आता सोडत काढण्याचाही मार्ग मोकळा झाला असून मंडळाने सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे.