भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांनी पत्रा चाळ घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चौकशीची मागणी केली आहे. गृहमंत्र्यांना यासंदर्भातील पत्र भातखळकर यांनी लिहिल्याची माहिती समोर आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक असे दावे-प्रतिदावे सुरु आहेत. अशातच शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करताना या प्रकरणाशी संबंध नसल्याचं म्हटलं आहे.
नक्की पाहा >> ‘बाप चोरणारी टोळी’वरुन उद्धव Vs शिंदे: ‘ठेचा खाणाऱ्यांनी ठेचलं’, ‘आपण बापाचा पक्ष…’, ‘…असं आम्ही म्हणायचं का?’; ठाकरेंना प्रत्युत्तर
पत्रा चाळ प्रकरणाचा लवकर तपास करावा अशी मागणीही पवार यांनी केली आहे. मात्र आता याच पत्रकार परिषदेवरुन भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी पवारांवर टीका केली आहे. विशेष म्हणजे ही टीका करताना त्यांनी या प्रकरणामध्ये गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली सक्तवसुली संचलनालयाच्या अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचाही उल्लेख केला आहे.
नक्की वाचा >> पत्रा चाळ प्रकरण : शरद पवारांच्या चौकशीच्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “…त्यानंतर मी नक्की…”
मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना सोमय्या यांना शरद पवारांच्या पत्रकार परिषदेचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला. “शरद पवार म्हणाले आहेत की पत्रा चाळ प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करावी,” असं म्हणत पत्रकाराने सोमय्यांचं यासंदर्भातील मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर सोमय्या यांनी, “खरं म्हणजे ईडीने कधी आरोप केलाच नाहीय. शरद पवार विषय दुसरीकडे फिरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना संजय राऊतांबद्दल सहानुभूती दिसतेय. आहो, चार्टशीट संजय राऊतांवर आहे,” असं म्हटलं.
नक्की वाचा >> शरद पवारांनी राज ठाकरेंच्या मर्मावर ठेवलं बोट; म्हणाले, “हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सुद्धा…”
त्याचप्रमाणे सोमय्या यांनी चिडून शरद पवार यांच्यामध्ये हिंमत असेल तर या प्रकरणासंदर्भातील काही गोष्टी स्पष्टपणे सांगाव्यात असंही थेट आव्हान केलं. “शरद पवारांमध्ये हिंमत असेल तर सांगावं ना की संजय राऊत निर्दोष आहेत. शरद पवारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी सांगावे की त्यांचे जे कौटुंबिक स्नेही असणारे वाधवान कुटुंबीय निर्दोष आहेत,” असं सोमय्या म्हणाले.
नक्की वाचा >> ठाकरे की शिंदे? दसरा मेळावा वादात संजय राऊतांची उडी; म्हणाले, “परवानगी मिळाली नाही तरी शिवसैनिकांनी…”
त्याचप्रमाणे सोमय्या यांनी या प्रकरणामधील आरोपी असणाऱ्या प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांचाही उल्लेख करत पवारांना आव्हान केलं. “शरद पवारांमध्ये हिंमत असेल तर सांगावं की प्रवीण राऊत निर्दोष आहेत. शरद पवारांमध्ये हिंमत असेल तर सांगावं की संजय राऊतांनी घेतलेली संपत्ती आणि (कमावलेला) पैसा निर्दोष (मार्गाने कमावलेला) आहे,” असंही सोमय्या यांनी म्हटलं.