मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर (पत्राचाळ) पुनर्विकासाअंतर्गत मूळ ६६३ भाडेकरूंच्या घरांची सोडत शुक्रवार, ४ एप्रिल रोजी काढण्यात आली. या सोडतीनंतर सोमवार, ७ एप्रिलपासून म्हाडाच्या मुंबई मंडळाने भाडेकरूंना घराचा ताबा देण्याचा निर्णय घेतला होता. घराचा ताबा घेण्यासाठी एकमेव भाडेकरू आला होता. काही तांत्रिक कारणामुळे ताबा प्रक्रिया झाली नाही. परिणामी, सोमवारी एकाही घराचा ताबा देता आला नाही. तर दुसरीकडे मोठ्या संख्येने मूळ भाडेकरुंनी घराचा ताबा न घेण्याची ठाम भूमिका घेतली आहे.
इमारतींची काही कामे अपूर्ण आहेत. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतरच घरांचा ताबा घेऊ, असा निर्णय भाडेकरुंनी घेतला आहे. ही कामे पूर्ण होण्यासाठीचा कालावधी लक्षात घेत मे महिन्यातच पत्राचाळवासिय हक्काच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
संगणकीय सोडतीला आक्षेप
वादग्रस्त आणि रखडलेल्या पुनर्विकासातील पुनर्वसित इमारती मुंबई मंडळाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आल्या आहेत. या इमारतींना गेल्या आठवड्यात पूर्णत: निवासी दाखला प्राप्त झाल्याने ४ एप्रिलला ६७२ पैकी ६६३ घरांसाठी सोडत काढण्यात आली. संगणकीय पद्धतीने सोडत काढण्याच्या मंडळाच्या निर्णयाला सोसायटी, रहिवाशांनी आक्षेप घेतला. त्यामुळे सोडतीच्या वेळी प्रचंड गोंधळ झाला. पण सोडत पार पडली असून सोडतीनंतर ७ एप्रिलपासून घरांच्या चाव्याचे वाटप अर्थात घराचा ताबा देण्यास सुरुवात होणार असल्याचे सोडतीच्या वेळी जाहीर करण्यात आले होते.
तात्काळ ताबा न घेण्यावर भाडेकरू ठाम
मुंबई मंडळाच्या या निर्णयानुसार सोमवारपासून घराचा ताबा देण्यास सुरुवात होणार होती. मात्र सोमवारी एक जण ताबा घेण्यासाठी आला होता. मात्र तांत्रिक कारणामुळे घराची ताबा प्रक्रिया होऊ शकली नाही, अशी माहिती म्हाडातील सूत्रांनी दिली. त्याचवेळी मोठ्या संख्येने रहिवाशांनी घराचा ताबा घेण्यास नकार दिल्याने पहिल्या दिवशी एकही ताबा झाला नाही. दरम्यान, जी काही तांत्रिक अडचण होती ती आम्ही दूर केली असून जे कोणी ताबा घेण्यास येतील त्यांना तो दिला जाईल अशी भूमिका मंडळाने घेतल्याचे सूत्रांंनी सांगितले. मात्र इमारतींची कामे अपूर्ण असून ही कामे पूर्ण झाल्यानंतरच आम्ही घराचा ताबा घेऊ, अशी माहिती सिद्धार्थनगर गृहनिर्माण सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजेश दळवी यांनी दिली. हे काम पूर्ण होण्यास महिनाभर लागण्याची शक्यता असल्याने मेमध्येच ताबा घेऊ, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता सोडत झाली असली तरी घराचा ताबा मात्र महिन्याभराने, मे महिन्यातच घेतला जाण्याची शक्यता आहे.