पोलिसांची गस्त असली की टवाळ-विकृत पसार होतात..त्यामुळे महिलांसाठी मुंबई सुरक्षित करायची असेल तर नसत्या घोषणांपेक्षा पोलिसांची गस्त नियमित झाली की आम्हाला आश्वस्त वाटेल, अशी भावना मुंबईतील महिलांच्या मनात आहे.
सुहिता सूर्यवंशी – महिन्यातून किमान चार-पाच वेळा तरी घरी येण्यास उशीर होतो. साडेअकरा-बाराच्या सुमारास रिक्षातून येण्यास भीती वाटते.  टॅक्सीवरही फारसा भरवसा ठेवता येत नाही. पोलिसांची गस्त दिसते ती नाकाबंदीवेळीच.  त्यांच्या संख्येत वाढ झाली तर आपसूकच समाजकंटकांवर चाप बसेल. एवढय़ा रात्री तुम्ही कुठे चालला आहात, असे विचारण्याऐवजी स्त्रियांना सुरक्षित प्रवासासाठी मदत करणे अपेक्षित आहे.
वैशाली चिंतकुंतला – या वर्षी जानेवारीत रिक्षासाठी उभी असताना दारुडय़ाने माझी छेड काढली होती. सहप्रवासी आणि रिक्षावाल्यानेही त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. मात्र कोर्टाच्या फेऱ्या कराव्या लागतील, म्हणून त्याच्याबाबत तक्रार करू नये, असा सल्ला मला पोलिसांनी दिला. त्याच्यावर कडक कारवाई झाली असती तर तो पुन्हा असे काही करण्याची हिंमत करू शकला नसता. पोलिसांचा पहारा वाढला, त्यांच्या हातात दंडुक्यासोबत इतर शस्त्रे दिली तर सुरक्षिततेसाठी अधिक सोयीचे ठरेल. रस्त्यावर सीसीटीव्ही लावायला हवेत.
अदिती गाडगे – रात्री प्रवास करताना मी सावध राहते. रात्री उशिरा मी रिक्षाने प्रवास करणे टाळते. रात्री बसने प्रवास करणे मला सुरक्षित वाटते. महिलांची छेडछाड करणाऱ्यांना कडक शिक्षा करायला हवी. म्हणजे जरब बसेल .
मुग्धा तोडणकर, विद्यार्थिनी- मला कॉलेजच्या निमित्ताने दादरहून नवी मुंबईला जावे लागते.  कुर्ला स्टेशनवर तर गर्दीचा फायदा घेऊन महिलांना नको त्या ठिकाणी हात लावण्याचे प्रकार वरचेवर होताना दिसतात.  ही माणसे इतकी निर्लज्जपणे वागत असतात की असहाय्यही वाटते. अशा माणसांना थोबाडीत मारून धडा शिकवायचा तर तो दुसऱ्याच क्षणाला गर्दीत कुठेतरी हरवून गेलेला असतो. या ठिकाणी पोलीस तरी काय करणार?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा