मुंबई : लाल मातीची होणारी धूप टाळता यावी, रस्ता सुस्थितीत राहावा, पर्यटनात वाढ व्हावी, धूळ उडू नये यासाठी माथेरानमधील मुख्य रस्ता आणि पर्यटनस्थळांकडे जाण्यासाठी बसविण्यात येणारी पेव्हर ब्लॉक माथेरानचे आर्कषण असणाऱ्या अश्वांच्या जीवावर उठली आहे. पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या मार्गाच्या उतरंडीवर अश्वांना चालणे मुश्कील झाले आहे. उतरंडीवर अश्वांचे पाय, कंबर मोडण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. जायबंदी झालेल्या १५ अश्वांपैकी दोन अश्वांचा या अपघातात मूत्यू झाला आहे.
माथेरानमधील रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक बसविण्यात यावेत असा एक मतप्रवाह आहे. त्याच वेळी माथेरानच्या सौंदर्याला बांधा येणारे हे पेव्हर ब्लॉक नको म्हणणाऱ्यांची संख्यादेखील आहे. लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव बसविण्यात येणारे हे पेव्हर ब्लॉक अश्वचालक व वैद्याकिय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने बसविण्यात आलेले नाहीत. त्याचा नाहक त्रास अश्वांना सहन करावा लागत आहे. पेव्हर ब्लॉकच्या उतरंडीवरून हळूवार उतरताना पाय मुरगळून आतापर्यंत १५ अश्व जायबंदी झाले आहेत. दोन अश्वांचा या दुखापतीत नंतर मूत्यू झाला. उतरंडीवरून उतरताना अश्वावर बसलेल्या एका पर्यटकाचा तोल जाऊन काही दिवसांपूर्वी मूत्यू झाला. पेव्हर ब्लॉकची उतरंड पर्यटक आणि अश्व दोघांच्या जीवावर उठली आहे. किमान उतरंडीच्या जागी माती किंवा जांभा दगडाचे तुकडे बसविणे गरजेचे असल्याचे अश्वपाल सांगतात पण त्यांच्या या मागणीकडे कोणी लक्ष देत नाही. पेव्हर ब्लॉक बसविताना अश्वांसाठी वेगळ्या रस्त्याची उभारणी करणे गरजेचे आहे.
हेही वाचा >>>गतिमान प्रशासनासाठी मुख्यमंत्र्यांचे नियोजन,सरकारची सुधारित कार्यनियमावली; प्रशासकीय शिस्तीचा आग्रह
माथेरानमध्ये पेव्हर ब्लॉक बसविताना पशु वैद्याकिय अधिकाऱ्यांचा सल्ला घेणे आवश्यक होते. पेव्हर ब्लॉक हा अश्वांच्या चालण्याचे, धावणाच्या मार्ग नाही. पर्यटकांच्या सोयीसाठी हे पेव्हर ब्लॉक बसविले जात असले तरी यात अश्वांचा विचार केला गेला नाही. अश्व रपेट करणाऱ्या पर्यटकांनाही या उतरंडींचा त्रास होत आहे. -डॉ. अमोल कांबळे, पशुवैद्याकीय अधिकारी, माथेरान
पर्यटकांसाठी सेवा सुविद्या झाल्या पाहिजेत. ई-रिक्षा ही काळाची गरज आहे. बाजारपेठेपर्यत ही सेवा कायम ठेवण्यात काहीच हरकत नाही, मात्र पर्यटनस्थळांपर्यत ये-जा करण्यासाठी अश्व योग्य आहे. सुविधा म्हणून बसविण्यात आलेले पेव्हर ब्लॉक आमच्या घोड्यांच्या जीवावर उठले आहेत.-राकेश कोकळे, अश्वपाल, माथेरान