राज्यातील जनतेच्या वतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या मागण्यांना रेल्वेमंत्र्यांनी केराची टोपली दाखविली आहे. ठाणे-भिवंडी, विरार- वसई- पनवेल, पनवेल- कर्जत मार्गावर उपनगरीय सेवा सुरू करण्याबरोबरच कराड स्थानकाचा आदर्श रेल्वे स्थानक म्हणून विकास करण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी रेल्वेमंत्र्यांना केली होती. मात्र त्यातील एकाही मागणीचा विचार झालेला नाही.
मुख्यमंत्री चव्हाण यांनी रेल्वे मंत्र्यांकडे काही महत्त्वाच्या प्रकल्पांची मागणी केली होती. मुंबई आणि परिसरातील या प्रकल्पांचा विचार रेल्वेने केल्यास त्याचा काही आर्थिक भार उचलण्याची तयारीही मुख्यमंत्र्यांनी दर्शविली होती. मुख्यमंत्र्यांचे दिल्लीतील राजकीय वजन पाहता यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काही भरीव मिळेल, अशी अपेक्षा केली जात होती.
ठाणे-भिवंडी आणि  विरार-वसई-पनवेल उपनगरीय मार्गाची आखणी करावी, पनवेल- कर्जत, खोपोली मार्गावर प्रवाशी वाहतूक सुरू करावी, विरार- डहाणू रोड- घोलवड मार्गाचे चौपदरीकरण, पनवेल-पेण दरम्यान उपनगरीय सेवा सुरू करावी, अशा मागण्या मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या. त्याचप्रमाणे रांजनपाडा-खारकोपर-सीवूड, खारकोपर -जीते, पनवेल-थळ, थळ-अलिबाग अशा नव्या मार्गाची  तरतूद अर्थसंकल्पात करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली होती. राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त आदर्श रेल्वे स्थानक योजनेमध्ये कराडसह नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद या स्थानकांचाही आदर्श स्थानक म्हणून विकास करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मागणीलाही रेल्वे मंत्र्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

Story img Loader