मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी सज्ज झालेल्या राष्ट्रवादीच्या आक्रमक कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला देऊन राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा विरोधातील आक्रमकतेची धार बोथट करण्यावर भर दिला आहे. यापूर्वी भाजपचे गोपीनाथ मुंडे यांनी मोहीम उघडली असता तेव्हाही आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना पवार यांनी शांत केले होते.
राज ठाकरे यांनी राज्यव्यापी दौऱ्यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. त्याची हिंसक प्रतिक्रिया उमटू लागली आहे. राज ठाकरे यांना जशास तसे उत्तर देण्यावर राष्ट्रवादीतील आक्रमक कार्यर्त्यांचा भर आहे. जालन्यातील सभेत शनिवारी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केल्यावर त्यांना पुण्यात येण्याचे आव्हान देण्यात आले होते. यामुळे दोन्ही बाजूने तयारी सुरू झाली होती. पण शरद पवार यांनी राज ठाकरे यांना अडविण्याचा इशारा दिलेल्या माजी महापौर अंकुश काकडे यांना सबुरीचा सल्ला दिला.
आंदोलन मागे
कोणी कोठेही जाऊन मते मांडावीत. कोणाच्याही मतस्वातंत्र्यावर घाला घालू नका, असेही पवार यांनी काकडे यांना समजावले. परिणामी राज ठाकरे यांच्या विरोधातील आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे काकडे यांनी जाहीर केले.
१९९३ नंतर भाजपचे गोपीनाथ मुंडे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली होती. मुंडे यांनी सर्वत्र सभा घेऊन पवार यांच्यावर जोरदार आरोप केले होते. पवार यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे व्यथित झालेल्या काँग्रेसमधील त्यांच्या समर्थकांनी मुंडे यांना धडा शिकविण्याची व्यूहरचना आखली होती. आव्हान-प्रतिआव्हान दिले जात होते. पण पवार यांनी तेव्हाही कार्यकर्त्यांना बोलावून असे काहीही करू नका, असे स्पष्टपणे बजावले होते, अशी आठवण तेव्हा पवार यांच्या मंत्रिमंडळात काम केलेल्या एका नेत्याने सांगितली.
काँग्रेसचे सूचक मौन
राष्ट्रवादी आणि मनसेत सुरू असलेल्या वादात न पडण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरमध्ये उत्तर दिले. पण या वादात अधिक पडू नये, अशीच काँग्रेसची भूमिका आहे.
राजविरोधातील आक्रमकतेची धार बोथट करण्याचा पवारांचा सल्ला
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी सज्ज झालेल्या राष्ट्रवादीच्या आक्रमक कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला देऊन राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा विरोधातील आक्रमकतेची धार बोथट करण्यावर भर दिला आहे.
First published on: 04-03-2013 at 03:34 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pawar adviced to party worker not to be agrassive against raj thackrey