चिपळूण येथील साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास होणाऱ्या विरोधाच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र त्याचे समर्थन केले. ठाकरे यांच्याबरोबर जरूर राजकीय मतभेद होते. पण पत्रकारिता आणि व्यंगचित्रे या क्षेत्रात ठाकरे यांचे योगदान आहे. यामुळे त्यांचे नाव व्यासपीठाला देण्यात काही गैर वाटत नाही, असे मत पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. साहित्य संमेलनावरून नेहमीच वाद होतात. त्यातून आपण संमेलनाला जाण्याचे टाळतो. पण चिपळूणमधील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी तसेच आयोजकांनी विनंती केल्यानेच उद्घाटक म्हणून आपण उपस्थित राहणार असल्याचे पवार यांनी सांगितले. ज्येष्ठ विचारवंत हमीद दलवाई यांच्या घरापासून ग्रंथदिंडी काढण्यास विरोध झाल्याने दिंडीच रद्द करण्यात आली याकडे लक्ष वेधण्यात आले असता दलवाई हे विचारवंत होते. आता विरोध का झाला याची कल्पना नाही, असेही पवार यांनी सांगितले.