मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, शिक्षणासाठी किंवा नोकरीच्या निमित्ताने देशातून आणि परदेशातूनही हजारो जण या मुंबापुरीत येत असतात. यामध्ये मुलांप्रमाणे मुलींचेही प्रमाण जास्त असते. अशाच मुंबईत पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या काही मुलींचे छुप्या पद्धतीने व्हिडियो शुटींग होत असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील गिरगाव भागात हा प्रकार घडला असून याप्रकरणी पोलिसांनी घरमालकाला अटक केली आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तीन मुली गिरगावात पेईंग गेस्ट म्हणून राहत होत्या. त्यामुळे अशाप्रकारे पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

घरमालक घरातील अॅडॅप्टरमध्ये असलेल्या कॅमेराच्या मदतीने मुलींच्या संभाषणाचे आणि इतर गोष्टींचेही चित्रिकरण करत होता. या अॅडॅप्टरवर मुलींनी पडदा लावला होता. परंतु काही दिवसांनी योग्य प्रकारे सिग्नल मिळत नसल्याने हा पडदा हटवावा असे घरमालकाने या मुलींना सांगितले. त्यानुसार त्यांनी पडदा हटवला खरा, पण अशाप्रकारे अॅडॅप्टर लावण्याविषयी मुलींना संशय आल्याने त्यांनी घरातील अॅडॅप्टरची माहिती घेण्यास सुरुवात केली. तेव्हा गुगलवर त्यांना अशाप्रकारच्या अॅडॅप्टरमध्ये कॅमेरा असल्याचे समजले. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर या मुलींनी थेट पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसांना घडल्या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घरमालकाला विनयभंग आणि माहिती व तंत्रज्ञानाचा गैरवापर या गुन्ह्यांची नोंद करत त्याला ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर अॅडॅप्टरमध्ये असलेल्या छुप्या कॅमेरातील व्हिडियो त्याच्या मोबाईलमध्ये दिसत असल्याचे पोलिसांना समजले.

Story img Loader