मुंबई : राज्यातील मध्य रेल्वेच्या १५ रेल्वे स्थानकांवरील नवीन पादचारी पूल खुले करण्यात आले आहेत. या पुलांची उभारणी २०२४-२५ मध्ये करण्यात आली असून या पुलांमुळे प्रवाशांना रेल्वे रूळ न ओलांडताना, पादचारी पुलावरून प्रवास करणे शक्य झाले आहे. तसेच रेल्वे रूळ ओलांडून अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे.
प्रवाशांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे या विभागात नवीन पादचारी पूल बांधण्यात आले. मुंबई विभागात गोवंडी, बदलापूर, कामण रोड येथे पादचारी पुलांचा त्यात समावेश आहे. तसेच मुंबई उपनगरीय विभागात अतिक्रमण नियंत्रित करण्यासाठी तीन नवीन पादचारी पूल बांधण्यात आले असून त्यात वडाळा – किंग्ज सर्कलदरम्यान, गोवंडी – मानखुर्ददरम्यान, शहाड – आंबिवलीदरम्यान बांधण्यात आलेल्या पुलांचा समावेश आहे. तसेच भुसावळ विभागात अंकई रेल्वे स्थानक; नागपूर विभागात तीगाव, पांदुरना, भरतवाडा; पुणे विभागात येवला, निंबलक, अकोळनेर, विळद, पाटस या रेल्वे स्थानकांत प्रत्येकी एक पादचारी पूल उभारण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नागपूर आणि अजनी येथे मोठ्या प्रमाणात पुनर्विकासाचे काम सुरू आहे. २२ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम प्रगतीपथावर आहे. होटगी स्थानकावर नवीन फलाट बांधण्यात आला आहे. नाशिक रोड स्थानकात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. तसेच खंडवा येथे द्वितीय श्रेणी प्रतीक्षालय आणि आरक्षण कार्यालय उभारण्यात आले आहे.
मध्य रेल्वेने २१२ पुलांचा पुनर्विकास केला आहे. रेल्वे मंडळाने १३५ हून अधिक पुलाचा पुनर्विकासाचे उद्दीष्ट्य दिले होते. परंतु मध्य रेल्वेने त्याहून अधिक पुलांची पुनर्बांधणी केली आहे. यामध्ये ५ महत्त्वाचे पूल, ५४ मोठे पूल, १५३ छोटे पूल उभारण्यात आले आहेत. गेल्या पाच वर्षांतील पुलांच्या पुनर्बांधणीची ही सर्वाधिक संख्या आहे. समांतर रस्ता फाटक (लेव्हल क्राॅसिंग गेट) बंद करून, त्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. २०२४-२५ या आर्थिक वर्षात ३१ समांतर रस्ता फाटक बंद करून त्या ठिकाणी ६ उड्डाणपूल, २२ भुयारी मार्ग आणि तीन रस्त्यांना वळणमार्ग तयार केले आहेत.
मध्य रेल्वेने २०२४-२५ मध्ये ४३४ किमी रेल्वे मार्गाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण केले. ७०२ किमी लांबीच्या मार्गाची तपासणी केली. यामुळे रेल्वे रुळाला तडा जाण्याच्या घटनेत कमालीची घट झाली आहे. तसेच रेल्वे मार्गावरील वेग मर्यादेत सुधारणा होईल आणि पर्यायाने रेल्वेगाड्यांच्या वेगात वाढ होईल. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास नियोजित वेळेत पूर्ण होईल.