मुंबईकरांना चालयाचे आहे. मुंबईकर चालत असतात. परंतु धावणाऱ्या मुंबईला चालणाऱ्या मुंबईकरांची पर्वा नाही. अशी परिस्थिती आहे. ‘मुसफिर हूं यारों…मुझे चलते जाना है, बस चलते जाना’. ही आपल्यासाठी फक्त कवि कल्पनाच राहिली आहे. मुंबईत चालायचे म्हटलं तर मुश्किल. आणि वाहनाचा पर्याय म्हणजे वाहतूक कोंडी. हे तर महामुश्किल..’जाये तो जाये कहां’…अशी मुंबईकरांची गत झाली आहे.

मुंबईकरांच्या रोजच्या पायी फेऱ्या मोजल्या तर अंदाजे तो हिशोब दीड कोंटीच्या आसपास असल्याचे एका अभ्यास अहवालात म्हटले आहे. यात घरापासून रेल्वे स्थानकपर्यंत अथवा बस थांब्यापर्यंत फेऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. खरं तर हे काही फार चालणे झाले नाही. परंतु या चालण्यात अनेक अडसर असतात. त्यामुळे अल्प काळासाठी चालणे हे सुद्धा अडथळ्याची शर्यत ठरते. अडथळे तरी किती? फेरीवाले हे मुख्य अरिष्ट. त्याबरोबरच दुकानांचे बेकादेशीर अतिरिक्त बांधकाम. उपाहरगृहांची वाढीव छपरे, हातगाड्या, टोपल्या, गटारांची झाकणे, इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यास वाळूचे ढिगारे, विटा, रेती, मुरुम, एवढेच काय तर राजकीय पक्षांचे फलके सुद्धा अनेकदा पदपथावर दिसतात. मुळातच आपल्याकडील पदपथांची संख्या जगातील इतर महानगराच्या तुलनेत कमी आहे. आणि त्यांचा असा धुव्वा उडालेला. भरिसभर म्हणून इमारतीतून कचरा, घाण, खरकट वरून टाकण्याची सर्रास पद्धत आपल्याकडे आहे. पु.ल देशपांडे यांचा एक मजेशीर किस्सा सांगतात. ते आपल्या मित्रासमेत पार्ल्याच्या एका रस्त्यावरुन जात असताना इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पु.लंच्या अंगावर भात पडला. ते थांबले आणि मान वर करून आपल्या मिश्किल शैलीत म्हणाले, ‘आहो भात मिळाला. आता वरण आणि तुप टाका’. पु.लंसारखी हजरजबाबी वृत्ती आणि सुक्ष्म विनोदबुद्धी प्रत्येक मुंबईकरांकडे नसते. आपण बिचारे असतो. चरफडत, तडतडत मुंबईच्या रस्त्यावर परिस्थितीशी ‘अॅडजस्ट’ करत असतो.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
Viral video shows car hitting woman distracted by phone the Internet is stunned by what she does next
फोनमध्ये पाहत रस्ता ओलांडते महिला, कारने दिली जोरदार टक्कर अन्…, थरारक अपघाताचा Video Viral
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू

जग कुठे धावते आहे आणि आपण कुठे हे पुढच्या उदाहरणावरून अधिक स्पष्ट होईल. पश्चिम उपनगरातल्या स्वामी विवेकानंद मार्गावर तर अनेक ठिकाणी गाईंचा कळप पदपथांसह रस्त्यावर बसलेला असतो. त्यामुळे वाहतुकीची कोंडी तर होतेच शिवाय चालणाऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. वर पुन्हा गाईला चारा घालणाऱ्या गोभक्तांची तिथे वर्दळ असते.

या विषयाची धग लक्षात येण्यासाठी एका अहवालाचा आधार घेऊ. मुंबईच्या रस्ते अपघातात मरण आलेल्या प्रत्येक १०० माणसांपैकी ५७ माणसे ही रस्त्यावरून चालताना मृत्यूमुखी पडतात. हा आकडा साधारण नाही. यानंतर क्रमांक येतो तो दुचाकी चालकांचा, शंभरात ३१ जण अशी मृत दुचाकी चालकांची संख्या आहे. ‘एम्बार्क इंडिया’ या वाहतूक क्षेत्रातल्या अग्रणी संस्थेच्या पाहणी अहवालाचा हा निष्कर्ष आहे. या अहवालात असेही नमुद करण्यात आले आहे की, गाड्यांची बेसुमार वाढती संख्या आणि वाहतूक कोंडी यामुळे पादचाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असेल. त्यामुळे प्रशासन आणि राज्य सरकारने मोठ्या मोठ्या प्रकल्पांप्रमाणे पदपथांसाठी तातडीने उपाय योजना करायला काहीच हरकत नाही.

तज्ज्ञांच्या मते विक्रोळी, नेहरू नगर, ट्रॉम्बे, खेरवाडी, मानखुर्द, विलेपार्ले, गोरेगाव आणि दहिसर या विभागांत पादचाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. पादचाऱ्यांनी भुयारी मार्ग, पादचारी पुल आणि स्कायवॉकचा उपयोग करणे गरजेचे आहे. इच्छित ठिकाणी वेळेवर पोहोचण्याच्या नादात नागरिक अनेकदा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गांवर चालण्याचे किंवा रस्ता ओलांडण्याचे ध्येय दाखवतात आणि वाहनाशी पाठशिवणीचा खेळ हा प्रसंगी जीवघेणा ठरतो.

मुंबईची पूर्ण वाहतूक रचना वाहनाभोवती फिरत असल्याने आणि वाहन हेच व्यवस्थेच्या केंद्रस्थानी असल्याने पादचाऱ्यांना प्रशासन आणि वाहतूक विभागाकडून उपेक्षाच मिळते. स्कायवॉक किंवा भुयारी मार्गांचा वापर करणे हे म्हणणे सोपे आहे. परंतु या दोन्हींची अवस्था फार दारुण आहे. अनेक भुयारी मार्ग आणि स्कायवॉक हे गर्दुल्यांचे आणि मवाल्यांचे अड्डे झाले आहेत. तिथे अनेक समाजविघातक प्रकार सुरू असतात. अनेक प्रमुख भुयारी मार्गांत तर दुकाने, विशेषत: दारुची दुकाने थाटलेली आहेत. तिथून जाणे सुद्धा नागरिकांना असह्य होते.

प्रत्येक नव्या सरकारतर्फे वाहतुकीसाठी कोट्यावधींच्या योजना आखल्या जातात. मात्र त्या प्रामुख्याने वाहनासाठी असतात. सरकार बदलत असते प्रकल्प मात्र पादचाऱ्यांच्या अडथळ्यांचे कारण ठरलेले असते. मुंबईच्या अंदाजे दीड कोंटी लोकसंख्येपैकी केवळ ८ टक्केच लोकांकडे वाहने आहेत. इतर ९२ टक्के लोक मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून आहेत. नियमानुसार एखादा रस्ता बांधताना किमान ८० फुट पदपथासाठी जागा राखून ठेवावी लागते. मात्र या नियमाचे काटेकोर पालन होत नाही आणि त़्याचा फटका पादचाऱ्यांना बसतो. आज स्वांतत्र्यानंतरही इतक्या वर्षांनी एकही पदपथ पादचाऱ्यांसाठी सर्वोत्कृष्ट आहे. असे आपण ठामपणे सांगू शकत नाही. ही दुर्दैवी बाबच म्हणावी लागेल.

मुंबईतील ५० ते ५२ टक्के लोक झोपडपट्ट्यांत राहतात. याचा अर्थ हे लोक एक तर चालतात किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात. कळीचा मुद्दा असा की, या दोन्हीं बाबींकडे प्रशासनाचे आणि सरकारचे दुर्लक्ष होत असते. सध्याची परिस्थिती पाहायची झाल्यास कुलाबा- वांद्रे विमानतळ सिप्झ, डीएन नगर- दहिसर, अंधेरी- दहिसर, वडाळा- घाटकोपर, ठाणे- कासरवाडीवली, वांद्रे- मानखुर्द हे प्रमुख मेट्रो मार्ग प्रकल्प रखडल्याने त्याचप्रमाणे पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गावर स्वंतत्र बस मार्गिकेचे काम मंदगतीने होत असल्याने लाखों पादचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
खासगी वाहनांच्या खरेदीविक्रीला पायबंद बसवा म्हणून अनेक नामवंत शहर रचना तज्ज्ञांनी चार महिन्यांपूर्वी ‘ब्रिक्स’ (ब्राझील, रशिया, चीन, भारत आणि दक्षिण आफ्रिका) परिषदेत एक नवा कर सुचवला होता. ही कल्पना जर मान्य झाली तर सरकारला दरवर्षी वाढीव उत्पन्न मिळेल. याचा उपयोग पादचाऱ्यांना अधिक सुविधां देण्यासाठी करता येईल, असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. रस्ताचे रुंदीकरण आणि उड्डाणपूल निर्मीती या दोन प्रकल्पांना राज्य सरकारकडून अग्रक्रम देण्यात येतो. परिणामी, वाहनाची बेसूमार गर्दी होते. गेल्या सहा वर्षांत पश्चिम उपनगरांत खासगी वाहनांची संख्या ५६ टक्क्यांनी वाढली. सदोष आणि एकांगी नियोजन पद्धतीमुळे मुंबईच्या पादचाऱ्यांच्या नशीबी हालच आहेत.

शुक्रवारी आषाढी एकादशी आहे. शेकडो वर्षं वारकरी पंढरीची वाट चालत आहेत. याच धर्तीवर मुंबईच्या पादचाऱ्यांनी रस्त्यावर चालण्याचा आपला हक्क बजावण्यासाठी पुढे आले पाहिजे. त्यासाठी एक लोकचळवळ बांधली पाहिजे. या दुष्टीने मुंबईच्या उपनगरात प्रयत्न सुरू झाले आहेत. किमान सुटीच्या दिवशी तरी पादचाऱ्यांना रस्त्यावर मोकळे, अनिर्बंध फिरता आले पाहिजे. यासाठी खार, वांद्रे, अंधेरी, घाटकोपर, दहिसर इथल्या सुजाण नागरिकांनी आपापले गट तयार केले आहेत. पायी हळूहळू चाला हेच त्यांचे ब्रीद आहे. मुंबईच्या वारीत तुम्ही कधी सामील होणार?