मुंबई: काही वर्षांपूर्वी महापालिकेने एका सामाजिक संस्थेला शीव-पनवेल मार्गावरील चेंबूर येथील पदपथावर शौचालय बांधण्याची परवानगी दिली होती. मात्र नागरिकांच्या विरोधामुळे या शौचालयाचे बांधकाम बंद करावे लागले. अर्धवट बांधकाम झालेले हे शौचालय पादचाऱ्यांना अडथळा बनू लागले असून हे बांधकाम तत्काळ जमीनदोस्त करावे, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
शीव-पनवेल मार्गावर सध्या ‘मेट्रो २ बी’चे काम सुरू असून या मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक हैराण झाले आहेत. चेंबूर नाका ते उमरशी बप्पा चौकादरम्यान कायम वाहतूक कोंडी होत असते. या परिसरात वाहनांची वर्दळ असते. सात ते आठ वर्षांपूर्वी पालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी येथील पदपथावर शौचालय बांधण्यासाठी परवानगी दिली होती. महापालिकेची परवानगी मिळताच संबंधित सामाजिक संस्थेने येथे शौचालयाच्या बांधकामाला सुरुवात केली. मात्र स्थानिक रहिवाशांनी या शौचालयाला विरोध करण्यास सुरुवात केली. तोपर्यंत शौचालयाचे ५० ते ६० टक्के काम पूर्ण झाले होते.
बांधकाम करण्यात येत असलेल्या शौचालयाच्या मागेच साखर फुटाणे तयार करण्याचा एक कारखाना असून शौचालयामुळे दुर्गंधी पसरण्याची शक्यता होती. त्यामुळे अनेकांनी यासंदर्भात केलेल्या तक्रारींची महापालिकेने दखल घेतली आणि नंतर शौचालय बांधण्यास परवानगी नाकारली. मात्र परवानगी नाकारल्यानंतर शौचालयाचे अर्धवट बांधकाम ‘जैसे थे’ ठेवण्यात आले. आता तेथे परिसरातील रहिवासी मोठ्या प्रमाणात कचरा टाकत आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. शिवाय या मार्गावरील वाढणाऱ्या कोंडीमुळे पादचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेने तत्काळ हे बांधकाम जमीनदोस्त करावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.