लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील उन्हाळी सत्र परीक्षांमधील विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण लेखी परीक्षेच्या एक आठवडाआधी ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे आदेश मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने दिले आहेत. सदर प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास विद्यापीठाच्या नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने एका परिपत्रकाद्वारे सर्व संलग्न महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांना सूचित केले आहे.
रखडलेले निकाल व जाहीर झालेल्या निकालांमधील असंख्य त्रुटी, परीक्षांचे विस्कळीत वेळापत्रक आणि प्रवेशपत्र मिळवताना येणाऱ्या अडचणींमुळे मुंबई विद्यापीठ प्रशासनाला टीकेचा सामना करावा लागतो. तसेच निकाल विलंबामुळे मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना आणि नोकरी मिळवताना अडचणींनाही सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गत उन्हाळी सत्र परीक्षांच्या अंतर्गत मूल्यमापनाचे म्हणजेच प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, प्रकल्प आदी गुण लेखी परीक्षेच्या एक आठवडाआधी ऑनलाईन पद्धतीने mum.digitaluniversity.ac आणि muexam.mu.ac.in या संकेतस्थळावर भरावे, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.