लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: मध्य रेल्वेवरील विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी अनेक मोहिमा राबविण्यात येतात. मध्य रेल्वेच्या तिजोरीत दंडाच्या रुपात कोट्यवधी रुपये जमा होतात. मात्र अनेक विनातिकीट प्रवाशांकडे रोख रक्कम नसते आणि तिकीट तपासनीसाना ऑनलाइन रक्कम स्वीकारण्यास परवानगी नाही. त्यामुळे प्रवासी आणि तिकीट तपासनीसांमध्ये अनेक वेळा खटके उडत होते. त्यामुळे आता रेल्वेच्या तिकीट तपासनीसांना दंडाची रक्कम स्वीकारण्यासाठी ‘पेमेंट स्कॅनर ॲप’ उपलब्ध करण्यात आले आहे. मुंबई विभागात १० तिकीट तपासनीसांना ऑनलाईन दंड स्वीकारण्यासाठी हे ॲप देण्यात आले आहे. त्यामुळे विनातिकीट प्रवाशांकडून ऑनलाइन पद्धतीने दंड वसूल करणे शक्य झाले आहे.
मध्य रेल्वेवरून दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करीत असून गर्दीचा फायदा घेऊन अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. विशेष पथके आणि विविध मोहिमा राबवून विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात येते. मात्र अनेक विनातिकीट प्रवासी दंडाची रक्कम भरण्यासाठी रोख रक्कम नसल्याचे कारण पुढे करतात. तसेच ऑनलाइन पद्धतीने दंडाची रक्कम भरण्याचा तगादा लावतात. यावरून तिकीट तपासनीस आणि प्रवाशांमध्ये वाद होतात. अशा घटना टाळण्यासाठी, विनातिकीट प्रवाशांना दंडाची रक्कम ऑनलाइन भरता यावी यासाठी मध्य रेल्वेने मोबाइल ॲपची निर्मिती करण्याच्या हालचाली डिसेंबर २०२२ मध्ये सुरू केल्या. गेल्या दोन महिन्यांपासून लांबपल्ल्यांच्या गाड्यांमध्ये काही तिकीट तपासनीसांना ‘पेमेंट स्कॅनर ॲप’वर देण्यात आले आहे. तसेच उपनगरीय रेल्वेवर कार्यरत १० तिकीट तपासनीसांना हे ॲप देण्यात आले आहे, असे वरिष्ठ रेल्वे तिकीट तपासनीसानी सांगितले.