प्राणिसंग्रहालयातील दर्शनगृहाचे काम पूर्ण न झाल्याने ‘सफारी’ लांबणीवर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील प्राणिसंग्रहालयात जुलैमध्ये आलेल्या पेग्विन या परदेशी पाहुण्यांच्या दर्शनाकरिता महापालिकेने आता ७ डिसेंबर ही नवीन तारीख निश्चित केली आहे. प्राणिसंग्रहालयात पेंग्विनचे आगमन झाले तेव्हा, पालिकेने ३० नोव्हेंबरपासून त्यांचे दर्शन सर्वसामान्यांना खुले करून देण्याचे जाहीर केले होते. परंतु एका पेंग्विनचा मृत्यू आणि त्यानंतर उठलेले काहूर आणि पेंग्विनच्या दर्शनगृहाच्या उभारणीतील विलंब यामुळे पेंग्विन दर्शनाची तारीख लांबणीवर पडली आहे.

सेऊल येथील कोअ‍ॅक्स अ‍ॅक्वेरियम येथून जुलै महिन्यात येथे ८ पेंग्विन पक्षी आणण्यात आले आहे. नागरिकांना पेंग्विन पाहता यावेत यासाठी काचेचे मोठे दर्शनगृह बांधण्यात येत आहे. १५ नोव्हेंबरला हे दर्शनगृह बांधून होणार होते व ३० नोव्हेंबरला ते नागरिकांसाठी खुले करण्यात येणार होते. मात्र, आता ३० नोव्हेंबरची मुदत पाळणे पालिका अधिकाऱ्यांना शक्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. दर्शनगृह पूर्णपणे तयार व्हायलाच ३० नोव्हेंबर उजाडण्याची शक्यता असल्याने त्यानंतर आठवडाभराने पेंग्विनचे दर्शन खुले करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली.

भायखळ्यातील हे ब्रिटिशकालीन उद्यान व प्राणी संग्रहालय तेथील प्राण्यांच्या मृत्यूमुळे सातत्याने चर्चेत राहिले आहे. गेली काही वर्षे बांधकामग्रस्त अवस्थेत असलेल्या या उद्यानात पाहण्याकरिता फारसे काही राहिलेले नाही. त्यातच येथे पेंग्विन आणण्याचा पालिकेचा निर्णय वादग्रस्त ठरला होता. पेंग्विनना मुंबईचे वातावरण झेपणार नाही, अशी ओरड पर्यावरणवादी व राजकीय पक्षांनी केली होती. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच त्यातील ‘डोरी’नामक पेंग्विन पक्ष्याचा मृत्यू झाल्याने पर्यावरणवाद्यांसह राजकीय पक्षांनी पालिका प्रशासन व पेंग्विन पक्षी आणण्यासाठी आग्रही असणारे युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवीत उर्वरित सात पक्षी परत पाठविण्याची मागणी केली. यामुळे सावध झालेली पालिका उर्वरित पक्ष्यांची डोळ्यांत तेल घालून काळजी घेत आहे.

संग्रहालयात नुकत्याच झालेल्या ‘डोरी’ या पेंग्विन पक्ष्याचा मृत्यू हा ग्राम निगेटिव्ह या जंतूंच्या संसर्गामुळे झाल्याचे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. महाविद्यालयाने ९ नोव्हेंबरला पालिकेला हे अहवाल सादर केले. त्यात जंतुसंसर्गामुळेच पेंग्विनचा मृत्यू झाला आहे, हे स्पष्ट होते, असे प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले. मात्र, अन्नातून विषबाधा झाल्यामुळे हा संसर्ग झाल्याच्या शक्यतेस त्यांनी नकार दिला. दरम्यान, पेंग्विन पक्ष्यांना तात्काळ येथून हलवणे आवश्यक असून पेंग्विन मृत्यूप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी या प्रकरणी तक्रार करणारे ‘रॉ’ या प्राणी मित्र संघटनेचे सुनीश कुंजू यांनी केली.

पेंग्विनसाठी उभारण्यात येत असलेल्या प्रेक्षक गॅलरीचे काम अद्याप पूर्ण झाले नसून तेथे काचा लावण्याचे काम सुरू आहे. हे काम ३० नोव्हेंबरला पूर्ण होईल. त्यानंतर गॅलरीची पूर्ण सफाई करून तेथील वातावरण पेंग्विन पक्ष्यांना राहण्यायोग्य आहे का याची तपासणी केल्यानंतरच पेंग्विन दर्शन खुले करता येईल.

सुधीर नाईक, पालिका उपायुक्त, सामान्य प्रशासन