महिन्याभरानंतर नव्या पाहुण्याच्या आगमनाचे संकेत

गेल्या वर्षी जुलै महिन्यात दक्षिण कोरियातून भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आलेल्या हम्बोल्ट पेंग्विनचा सध्या ‘मोल्टिंग’ अर्थात पिसेझडीचा काळ सुरू झाला आहे. या काळात पेंग्विनची पिसे झडून नवीन पिसे येतात. त्यामुळे महिनाभरानंतर तजेलदार कांतीने उजळून गेलेल्या पेंग्विनना पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. एवढेच नव्हे तर, पेंग्विनचा प्रजनन काळही त्यानंतर सुरू होणार आहे.

जुलै ते सप्टेंबर या महिन्यांत हम्बोल्ट पेंग्विन पक्ष्यांची पिसे झडून त्यांना नवीन पिसे येतात. याला ‘मोल्टिंग’ असे म्हणतात. पेंग्विनच्या वाढीकरिता हा काळ महत्त्वपूर्ण असतो. मात्र या काळात पेंग्विन चिडचिडे होत असल्याने आपल्या जोडीदारापासून लांब राहतात. मार्च ते जुलै आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा पेंग्विनचा विणीचा काळ असतो; परंतु ‘मोल्टिंग’ सुरू झाल्याने नव्या पेंग्विनचे आगमन महिनाभर लांबणीवर पडणार आहे.

सध्या पेंग्विन कक्षात पोपया-ऑलिव्ह, मोल्ट-बबल, डोनल्ड-डेझी या तीन जोडय़ा आहेत. फ्लिपर या मादी पेंग्विनला मात्र जोडीदार नाही. त्यामुळे उरलेल्या तीनपैकी एका जोडीने जरी नर पेंग्विनला जन्म दिला तर फ्लिपरचा एकांत संपेल.

अनेकदा मोल्टिंगच्या काळात सहकारी पेंग्विनला मारणे, चावणे अशा गोष्टीही ते करतात. त्यामुळे या काळात पेंग्विनची जास्त काळजी घेण्याची आवश्यकता असते, असे पेंग्विनचा सांभाळ करणाऱ्या पशूवैद्यक डॉ. मधुमिता काळे यांनी सांगितले. बबलचे मोल्टिंग आताच सुरू झाले आहे. तर ऑल्विवचे साधारणपणे पुढील महिन्यापर्यंत संपण्याच्या बेतात आहे. इतरांचा मोल्टिंग काळहा काही दिवसात संपेल. बहुतांश जुलै ते सप्टेंबर या काळात पेंग्विनचा मोल्टिंग काळ संपतो. मात्र ऑलिव्हला मोल्टिंग काळ येण्यासाठी वेळ लागला आहे, असे डॉ. काळे यांनी सांगितले.

मोल्टिंगचा परिणाम काय?

पेंग्विन अधिक काळ पाण्यात वावरत असल्याने त्यांची पिसे चांगली असणे आवश्यक आहे. यासाठी मोल्टिंगचा काळ महत्त्वपूर्ण ठरतो. त्यासाठी दर वर्षी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत त्यांच्या शरीरावरील सर्व जुनी पिसे गळून पडतात व नवीन पिसे येत असतात. प्रत्येक पेंग्विनमागे नवीन पिसे येण्यासाठी साधारण १५ ते २० दिवसांचा काळ जातो. पेंग्विन सुदृढ राहण्यासाठी मोल्टिंग काळ महत्त्वाचा ठरतो. मोल्टिंगनंतर मात्र ते अतिशय ताजेतवाने होतात. त्यामुळे सप्टेंबर महिना संपेपर्यंत सर्वच पेंग्विन अधिक ताजेतवाने व चमकदार दिसतील. मात्र मोल्टिंगच्या काळात पेंग्विन तणावाखाली असतात. तसेच, खूप चिडचीडही करतात. मोल्टिंगचा काळ सुरू असताना ते एकमेकांपासूनही दूर राहतात.

वजन नियंत्रणात

मोल्टिंगच्या काळात पेंग्विन खातातही कमीच. मात्र त्याआधी त्यांचा आहार वाढलेला असतो. त्यामुळे त्यांचे वजनही वाढते. उद्यानातील पेंग्विनचे वजनही जुलै ते ऑगस्टदरम्यान खूप वाढले होते. मोल्टिंगच्या काळात खाणे कमी होत असल्याने हा काळ संपल्यानंतर त्यांचे वजन नियंत्रणात येईल, अशी शक्यता आहे.