मुंबई : केवळ ‘पेन्शन अदालती’दरम्यानच नव्हे, तर सामान्य कामकाजाच्या दिवशीही निवृत्ती वेतनधारकांच्या समस्यांची दखल घेतली जाईल आणि त्यांच्या निराकरणासाठी कार्मिक व लेखा विभाग पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन मुंबई सेंट्रलचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज वर्मा यांनी दिले.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागातर्फे रेल्वे निवृत्ती वेतनधारक आणि कौटुंबिक पेन्शनधारकांसाठी ‘पेन्शन अदालती’चे आयोजन करण्यात आले होते. नीरज वर्मा आणि इतर वरिष्ठ विभागीय रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही पेन्शन अदालत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…रेल्वेगाडीचे शयनयान डबे हटवले
निवृत्ती वेतनधारकांव्यतिरिक्त पश्चिम रेल्वे कर्मचारी संघ, सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी संघटना, वलसाड आणि सुरत रेल्वे पेन्शनर्स असोसिएशनसह इतर संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान निवृत्ती वेतनधारकांच्या तक्रारी ऐकून त्यांची चौकशी केली आणि त्यांचे निराकरण करण्यात आले. एकूण ५८ प्रकरणे प्राप्त झाली असून ती सर्व प्रकरणे सोडविण्यात आली. पेन्शन अदालतीदरम्यान विभागीय रेल्वे व्यवस्थापक वर्मा यांनी सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांना २१ पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) सुपूर्द केल्या.