मुंबईमधील नागपाडा येथे गणपती आगमनाच्या सोहळ्यादरम्यान गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. नागपाडा येथील गणपती आगमनादरम्यान एका व्यक्तीने गोंधळ घातल्याने तिला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या व्यक्तीने गणपती आगमनाच्या वेळेस घातलेल्या गोंधळानंतर स्थानिकांनी विरोध करुन आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे.
नागपाडा येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांच्या आगमन सोहळ्यांना सुरुवात झाली आहे. रविवारी रात्री अशाच एका आगमन सोहळ्यादरम्यान एका विकृत व्यक्तीने मूर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतापलेल्या स्थानिकांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन सुरु केलं. स्थानिकांनी पोलीस स्थानकाला चारही बाजूंनी घेरलं आणि दोषी व्यक्तीविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. या आंदोलनामुळे काही काळ या परिसरामध्ये तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी या प्रकरणामध्ये या व्यक्तीला अटक केली. यासंदर्भातील माहिती पोलीस उपायुक्त योगेश कुमार यांनी दिली आहे.
“या प्रकरणामध्ये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला तातडीने अटक करण्यात आली आहे. कलम २९५ अ आणि १५३ अ अंतर्गत नागपाडा पोलीस स्थानकाच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असून परिसरामध्ये शांतता आहे,” अशी माहिती पोलीस उपायुक्त योगेश कुमार यांनी एएनआयला दिली.
दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर पहिल्यांदाच यंदा मुंबईत निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असताना अनेक ठिकाणी मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. असं असतानाही भायखळ्याजवळील नागपाड्यामध्ये असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.