मुंबई : यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर घरे आणि वाहनांची मोठय़ा प्रमाणात खरेदी झाली. नोव्हेंबरच्या पहिल्या १३ दिवसांत मुंबईमध्ये पाच हजारांवर सदनिकांची विक्री झाली. यातून मुद्रांक शुल्कापोटी सरकारला तब्बल ३७५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. दुसरीकडे शहरातील चार आरटीओमध्ये चार हजारांवर वाहनांची नोंदणी झाली. तर गेल्या दीड महिन्यात राज्यभरात ८२३ नव्या गृहप्रकल्पांचा आरंभही करण्यात आला आहे.
घर, वाहन यासारखी महत्त्वाची खरेदी करताना अनेक जण साडेतीन मुहूर्ताना प्राधान्य देतात. गुढीपाडवा, अक्षय्य तृतिया व दसरा या तीन मुहूर्तासह दिवाळीचा पाडवा या अर्ध्या मुहूर्तालाही मोठय़ा प्रमाणात खरेदी केली जाते. मुंबईत १ ते १३ नोव्हेंबर या काळात ५,१४३ घरांची विक्री झाली. ऑक्टोबरमध्ये १० हजार ६०७ घरांच्या विक्रीतून ८३५ कोटींचा महसूल मिळाला होता. गतवर्षी नोव्हेंबरच्या ३० दिवसांमध्ये ८,९६५ घरांची विक्री झाली होती. गेले दोन दिवस नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कार्यालयांना सुट्टी असल्याने मुद्रांक शुल्क वसुली बंद आहे.
हेही वाचा >>> पाणीसाठय़ात २० टक्के घट; राज्याला दुष्काळझळा, १२०० गावांना टँकरने पाणीपुरवठा
अन्यथा घरविक्रीची संख्या आणखी वाढली असती, असे सांगितले जात आहे. एकीकडे घरविक्री वाढली असतानाच चौकशी, प्रकल्प स्थळांना भेटी, घरांचा ताबा घेणे आणि गृहप्रवेश यांनाही प्राधान्य दिल्याचे दिसून आले. मंगळवारी पाडव्याच्या दिवशी अनेकांनी हक्काच्या घरात प्रवेश केला. विकासकांसाठी सणासुदीचा काळ त्यातही दिवाळीचा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळेच या काळात नवीन प्रकल्पाची सुरुवात करण्याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळेच यंदा १ ते १३ नोव्हेंबरदरम्यान महारेराकडे ४१४ नवीन प्रकल्पाच्या नोंदणीसाठी अर्ज आले होते. तर यातील १७८ प्रकल्पांना महारेरा नोंदणी क्रमांक प्राप्त झाला आहे.
सोने खरेदीला पसंती
दसऱ्यापासून वाढलेला सोने खरेदीचा उत्साह दिवाळीमध्ये कायम राहिला. नोव्हेंबर महिन्यातील लग्नसराई आणि आंतरराष्ट्रीय भूराजकीय परिस्थितीमुळे भविष्यात सोने महाग होण्याच्या धास्तीने सध्या सोने खरेदीकडे अधिक कल दिसून येत आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत सोने प्रतितोळा १० हजारांनी महाग झाले असले, तरी ग्राहकांचा उत्साह कमी झालेला नाही. २५ ते ५० टक्क्यांची सूट असल्यामुळे दागिन्यांकडे कल असला तरी, वळी, नाणी आणि बिस्कीटे अशा स्वरूपाचे सोने खरेदी करण्याकडेही कल होता.
वाहन खरेदीला जोर..
दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईत वाहन खरेदीचाही उत्साह दिसला. मुंबईतील चार आरटीओ विभागांत १० ते १५ नोव्हेंबरदम्यान ४,०१४ वाहनांची नोंदणी आणि खरेदी झाली. गेल्यावर्षीच्या दिवाळीच्या काळात २,९५८ वाहनांची खरेदी झाली होती. यंदा यात १,०५६ची वाढ झाली.
आरटीओ वाहने
बोरीवली ९९०
ताडदेव १,०१६
वडाळा १,१४८
अंधेरी ८६०