Raj Thackeray New Year Massage: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी निकालावर फारसे भाष्य केलेले नाही. तसेच पक्षाची सभा किंवा राजकीय कार्यक्रम घेतलेला नाही. मात्र आज नववर्षाच्या स्वागतानिमित्त त्यांनी एक सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये राजकारणाबद्दल भाष्य केले आहे. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांना या पोस्टद्वारे नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच प्रत्येक समस्येच्या वेळेस लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आठवण होणे, पण नेमके मतदानाच्या वेळेस पक्षाचा विसर पडणे, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली आहे.
राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरे या पोस्टमध्ये म्हणाले, या “२५ वर्षांच्या कालखंडात आपला पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्याची स्थापना झाली, तो स्थिरावला, पक्षाने अनेक चढउतार पाहिले. आणि हे सगळं आपल्या सगळ्यांना खूप काही शिकवून गेलं. या २५ वर्षांत जरी खूप बदल झाला असला तरी अनेक गोष्टी तशाच राहिल्यात, मुंबईसारख्या महानगरात जी महाराष्ट्राची राजधानी आहे, तिथे मराठी माणसाला असुरक्षित वाटणं. तरुण मुलामुलींच्या हाताला काम न मिळणे पण त्याच वेळेस बाहेरच्या राज्यातून येणाऱ्यान नोकरीच्या संधी मिळणं. बेरोजगाराला जात नसते, पण त्याला ती जात जाणवून देऊन, जातीजातीत भांडणं लावणं. शेतकऱ्यापासून ते सर्वच कष्टकऱ्यांच आयुष्य महागाईने होरपळून निघणं. आणि या आणि इतर प्रत्येक समस्येच्या वेळेस लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आठवण होणे, पण नेमकं मतदानाच्या वेळेस पक्षाचा विसर पडणे.
निकालावर माझं मंथन सुरू
राज ठाकरे पुढे म्हणाले, “२३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभेचे निकाल लागल्यानंतर मी काही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालो, पण मुद्दाम राजकीय भाष्य टाळलं. नक्की काय घडलं यावर माझं मंथन सुरु आहे आणि लवकरच मी या सगळ्यावर सविस्तर बोलेन. पण महाराष्ट्र सैनिकांना माझं आवाहन आहे की जे घडलं ते विसरून जा. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पुढे काही आठवड्यातच मराठी माणसांविरोधात दंडेलशाही सुरु झाली, आणि त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दणका द्यावा अशी अपेक्षा व्यक्त झाली आणि जे आपण केलं देखील. मुळात मराठी माणूस हा फक्त मतदानासाठी वापरला जातोय हे वास्तव अधोरेखित झालं. त्यात महिलांविरोधात अत्याचार वाढतच आहेत. राज्यातले दोन समाज जे दोन्ही मराठी भाषिक, पण त्यांच्यात संघर्ष पेटला आहे. आणि महागाईने लोकं होरपळली आहेत.”
हे ही वाचा >> Vinod Kambli video: हातात बॅट, स्ट्रेट ड्राईव्ह लगावत विनोद कांबळी स्वतःच्या पायावर रुग्णालयाबाहेर; म्हणाला; “दारू…”
मनसे कार्यकर्त्यांनी खंत बाजूला ठेवावी
“महाराष्ट्र सैनिकांनी स्वतःच्या मनातील खंत आता बाजूला ठेवली पाहिजे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण काहीच करत नाही, त्यामुळे या सगळ्यात आता कृती करण्याची जबाबदारी आपलीच आहे. मी मागे म्हणलं तसं मराठीवर कोणी हल्ला केला तर मराठी म्हणून आणि हिंदू माणसाच्या गळ्याला नख लावलं तर हिंदू म्हणून मी अंगावर येईन, ते आपण करत आहोतच”, असेही ते म्हणाले.