जळगाव येथील घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने कायमस्वरूपी जामीन मंजूर केला आहे.वाढते वय आणि प्रकृती अस्वस्थ्यामुळे जैन यांना आधीच न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता.न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने यांची कायमस्वरूपी जामिनाची मागणी मान्य केली. वाढते वय आणि प्रकृतीच्या कारणास्तव न्यायालयाने जैन यांना कायमस्वरूपी जामीन मंजूर केला आहे.

हेही वाचा >>>मुंबई: पश्चिम रेल्वेवरील नव्या एसी लोकलसाठी वर्षभराची प्रतिक्षा

जळगावमधील घरकुल प्रकरणी सुरेशदादा जैन यांच्यासह अन्य आरोपींना धुळे जिल्हा न्यायालयाने आरोपांत दोषी ठरवून सात वर्ष कारावासाची शिक्षा आणि शंभर कोटी रुपये दंडही सुनावला होता. जैन यांच्यासह आरोपींची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली होती. यातील काही अपवाद वगळता इतरांना जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र प्रमुख आरोपी सुरेशदादा जैन यांना दिलासा मिळालेला नव्हता. त्यांना नंतर उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता. जैन यांनी शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपिलही दाखल केले आहे.

हेही वाचा >>>मुंबई: विजय केंकरे यांचे रंगभूमीवर शतक; ‘काळी राणी’ नाटकाचा ११ डिसेंबर रोजी प्रयोग

प्रकरण काय आहे ?
या घरकुल योजनेत सुमारे पाच हजार घरांची बांधणी होणार होती. मात्र अवघी १५०० घरेच बांधण्यात आली. बांधकामव्यावसायिक आणि अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून आरोपींनी संगनमताने यामध्ये गैरप्रकार केला असा आरोप आहे. २००६ मध्ये तत्कालिन महानगरपालिका आयुक्तांनी याबाबत रितसर तक्रार केली होती. जैन यांना याप्रकरणी मार्च २०१२ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना सर्वोच्च न्यायालयातून अंतरिम जामीन मंजूर झाला होता.

Story img Loader