मुंबई : विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित करण्यात आलेल्या आक्षेपांची नोंद घेऊन मुंबई महानगरपालिकेने दक्षिण मुंबईमधील मुंबादेवी परिसरातील अत्याधुनिक रोबोटिक वाहनतळाचे काम सहा महिन्यांपूर्वी बंद असून प्रकल्पस्थळी ‘जैसे थे’ स्थिती आहे. वाहनतळाचे काम पूर्ण करण्यासाठी दिलेली मुदत संपुष्टात येत असून प्रकल्प खर्च वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे स्थगिती उठवून अत्याधुनिक रोबोटिक वाहनतळाची कामे सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती करणारे पत्र मुंबई महानगरपालिका आयुक्त, प्रशासक भूषण गगराणी यांनी नगर विकास विभागाच्या सचिवांना पाठविले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दक्षिण मुंबईमधील मुंबादेवी परिसर दाटीवाटीचा असून तेथे कायम पादचारी, वाहनांची वर्दळ असते. घाऊक बाजारपेठांमुळे व्यापारी आणि ग्राहकांचा तेथे राबता आहे. त्याचबरोबर मुंबादेवी मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्याही प्रचंड आहे. अरुंद रस्त्यांमुळे या परिसरात कायम वाहतूक कोंडी होते. येथे सार्वजनिक वाहनतळ नसल्यामुळे रस्त्यांवरच वाहने अस्ताव्यस्त उभी करण्यात येतात. एकूणच परिस्थिती लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने मुंबादेवी परिसराचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय घेतला होता. वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सुशोभिकरण प्रकल्पामध्ये अत्याधुनिक रोबोटिक वाहनतळ उभारण्याचे प्रस्तावित होते. त्यानुसार या वाहनतळाचे काम निविदा प्रक्रिया राबवून एसएमएस लिमिटेड या कंपनीला देण्यात आले. या कंत्राटदाराने वाहनतळाच्या कामाला सुरुवातही केली. मात्र यासंदर्भात विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे आक्षेप नोंदविण्यात आले. या आक्षेपांची नोंद घेऊन सदर वाहनतळाचे काम उच्चस्तरावर योग्य तो निर्णय होईपर्यंत स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार महानगरपालिकेने १२ जुलै २०२४ रोजी वाहनतळाचे काम बंद केले. प्रकल्पस्थळी कोणतेही बांधकाम करू नये आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, असे निर्देश महापालिका प्रशासनाने कंत्राटदाराला दिले. त्यानुसार आजघडीला या वाहनतळाचे काम बंदच आहे.

हेही वाचा – मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण, जयदीप आपटे याला उच्च न्यायालयाकडून जामीन

हेही वाचा – ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ सुसाट, ताशी ८० किमी वेगाने मेट्रो धावणार

प्रस्तावित कामाची मानवाधिकार आयोगाने दखल घेतली असून प्रस्तावित कामे विकास नियोजन आराखडा २०२३ नुसार करण्यात येत असल्याचे आयोगाला कळविण्यात आले आहे. महापालिकेने मुंबादेवी परिसर सुशोभिकरण प्रस्तावित केले असून त्यामध्ये मुंबादेवी मंदिरालगतच्या उद्यानाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. या विभागातील विविध स्थानिक संघटनांनी पाठवलेल्या पत्रात वाहतूक समस्यांवर उपाययोजना करण्याची विनंती केली होती. तसेच सदर वाहनतळाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी होत आहे. वाहनतळ उभारण्यासाठी कंत्राटदाराला दिलेला कालावधी संपुष्टत येण्याची चिन्हे आहेत. तसेच वाहनतळ उभारण्याच्या खर्चात वाढ होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, यासंदर्भात विधानसभेत झालेली चर्चा, श्री मुंबादेवी मंदिर न्यासाने पत्राद्वारे केलेली विनंती याचा सर्वंकष अभ्यास करून योग्य ती कारवाई करावी, तसेच विधिमंडळाचे अभिप्राय घेऊन वाहनतळाचे काम पुन्हा सुरू करण्याबाबत योग्य ते आदेश द्यावेत, अशी विनंती आयुक्तांनी पत्रात केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Permission should be given for the construction of a state of the art robotic parking lot in mumbadevi mumbai municipal corporation to state government mumbai print news ssb