मुंबई – दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या नातेवाईकाला अडचणीत आणण्यासाठी ५२ वर्षीय व्यक्तीने थेट मुंबई पोलिसांना दूरध्वनी करून मला दोघांनी आमदार आशिष शेलार यांना गोळी मारण्यास सांगितल्याचे सांगितले. चौकशीत ही माहिती खोटी असलेल्याचे उघड झाल्यानंतर याप्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी मंजूर अहमद मेहमूद कुरेशी (५२) याला अटक केली. कुरेशी १९९३ मधील मुंबईतील साखळी स्फोटातील माफीचा साक्षीदार आहे.
हेही वाचा – कोनमधील २,४१७ घरांच्या दुरुस्तीची तयारी सुरू; पुढील आठवड्यात निविदा मागविणार
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात रात्री नऊच्या सुमारास दूरध्वनी आला होता. त्यात परवेझ कुरेशी व जावेद कुरेशी यांनी आमदार आशिष शेलार यांना गोळी मारण्यास सांगितले आहे. आपल्याला मदत हवी आहे, असे समोरच्या व्यक्तीने सांगताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा, आरोपी दारूच्या नशेत असल्याचे निदर्शनास आले. धक्कादायक बाब म्हणजे परवेझ आणि जावेदने दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून मंजूर अहमद मेहमूद कुरेशी (५२) याने त्यांना अडकवण्यासाठी दूरध्वनी केल्याचे निष्पन्न झाले. कुरेशी हा मुंबई १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणातील माफीचा साक्षीदार आहे. निर्मल नगर पोलिसांनी रात्री उशिराने त्याला अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. कुरेशी वांद्रे परिसरातील रहिवासी आहे.