लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : लालबाग परिसरात प्रचंड गर्दी झाल्याचा फायदा घेऊन भाविकांचे दागिने चोरण्यासाठी आलेल्या १९ वर्षीय तरुणाला काळाचौकी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी सोालापूर जिल्ह्यातील असून गणेशोत्सवाच्या काळात चोरी करण्यासाठी तो मुंबईत आल्याचा पोलिसांना संशय आहे. लालबागच्या गणेश गल्लीतील मुंबईचा राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकाची अडीच तोळ्यांची सोनसाखळी हिसकावताना त्याला पकडण्यात आले.

प्रदिप चंद्रकांत काळे (१९) असे अटक आरोपीचे नाव असून तो व्यवसायाने शेतकरी असल्याचे त्याने चौकशीत सांगितले. लालबागचे रहिवाशी असलेले राजेश बाळा कुणकवळेकर (४५) यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीनुसार, शनिवारी ते रविवारी सकाळच्या सुमारास ते कुटुंबासह गणेश गल्ली, लालबाग येथील मुंबईचा राजा येथे गणपतीच्या दर्शनासाठी गेले. गर्दीचा फायदा घेत त्यांच्या मागे असणाऱ्या एकाने त्यांच्या गळ्यातील पावणे दोन लाख किंमतीची अडीच तोळ्याची सोनसाखळी हिसकावली.

आणखी वाचा-Mumbai Accident : वांद्रे-वरळी सी-लिंकवर शर्यतीच्या नादात भीषण अपघात; BMW व Mercedes च्या धडकेत टॅक्सी उलटली

राजेश यांनी तत्काळ सोनसाखळी ओढणाऱ्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याकडून चोरलेली सोनसाखळीही हस्तगत करण्यात आली आहे. चौकशीनंतर गुन्ह्यांत सहभाग निष्पन्न झाल्यानंतर प्रदिप चंद्रकांत काळे (१९) याला अटक केली आहे. काळे हा सोलापूरचा रहिवाशी असून शेतीचा व्यवसाय करत असल्याचे सांगितले. आरोपीने यापूर्वीही दागिन्यांची चोरी केल्याचा संशय असून त्याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Person who stole jewellery from devotees was arrested in lalbagh mumbai print news mrj