लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या ३८ वर्षीय व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याचा गंभीर प्रकार मालाड पश्चिम येथे घडला. मालवणी पोलिसांनी याप्रकरणी आरोपी गोविंद मोतिसिंह चव्हाण ऊर्फ नन्या (३५) याला ताब्यात घेतले. त्यावेळी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी आरोपी व पोलीस पथकावर दगडफेक केली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मालवणी येथील पारधी वाड्यातील लक्ष्मी चाळ येथे आरोपी नन्या व एका व्यक्तीचे सोमवारी भांडण झाले. भांडण सोडवण्यासाठी अर्जुन काळे (३८) तेथे गेले. भांडण करणारे दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय आहे. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या काळेच्या छातीवर नन्याने चाकूने वार केला. त्यानंतर काळे खाली कोसळला. त्यानंतर काळेला शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
आणखी वाचा-आशा सेविकांचा भाऊबीजेच्या दिवशी मुंबई महानगरपालिकेवर ओवाळणी मोर्चा
घटनेनंतर मालवणी पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला व नन्याला ताब्यात घेतले. त्यावेळी दोन महिला व दोन पुरूषांनी नन्यावर हल्ला केला. त्यांनी नन्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्याच्यावर दगड, विटांनी हल्ला केला. या दगडफेकीमध्ये पोलीस शिपाई विलास आव्हाड व नन्या जखमी झाले. याप्रकरणी दोन महिला व पुरूष यांच्याविरोधातही सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व पोलिसाला जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.