लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : ढिसाळ नियोजन आणि वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा म्हणजेच ‘पेट’ आणि पदव्युत्तर विधि अभ्यासक्रमाची (एलएलएम) प्रवेशपूर्व परीक्षा डोंबिवलीतील सुरेखा इन्फोटेक या केंद्रावर रविवार, १७ नोव्हेंबर रोजी होऊ शकली नाही. आता डोंबिवली केंद्रावरील विद्यार्थ्यांची विभागणी करून दोन वेगवेगळ्या केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार या केंद्रावरील दोन्ही प्रवेशपूर्व परीक्षा रविवार, २४ नोव्हेंबर रोजी फादर सी. रॉड्रिग्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि चेंबूर येथील शाह आणि अँकर अभियांत्रिकी महाविद्यालय या दोन केंद्रांवर घेण्यात येणार आहेत. सदर विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये आणि ई-मेल आयडीवर प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करण्यात आले आहे.

आणखी वाचा-मंत्रालयातील लिपिकाला मारहाणीचे प्रकरण : बच्चू कडू यांची निर्दोष सुटका

‘पेट’ सकाळच्या सत्रात १०.३० ते दुपारी १२.३० या दोन तासांच्या कालावधीत होईल, तर ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षा दुपारी ३ ते ४ या एक तासाच्या कालावधीत घेतली जाणार आहे. परीक्षार्थिंनी परीक्षेच्या १ तास आधी संबधित परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे. या दोन्ही परीक्षा ऑनलाइन सेंटर बेस्ड टेस्ट ( सीबीटी) पद्धतीने दोन्ही केंद्रांवर घेतल्या जातील.